Home प्रशासन दुष्काळग्रस्तांचा सातबारा कोरा करा, लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्या ; अंबादास दानवेंचा...

दुष्काळग्रस्तांचा सातबारा कोरा करा, लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्या ; अंबादास दानवेंचा रावेरमध्ये सरकारविरोधात जनआक्रोश मोर्चा !

0
12


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, सर्वसामान्य नागरिकांच्या घरांमध्ये स्मार्ट मीटर बसविणे बंद करा, लाडकी बहीण योजनेतील महिलांना दरमहा २१०० रुपये द्या आणि ग्रामीण व शहरी भागातील घरकुल योजनेचे अनुदान पाच लाख रुपये करा, अशा विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रावेर येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत झालेल्या या मोर्चातून महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवरून भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

रावेर शहरातील छोरिया मार्केट येथून या जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात सहभागी झालेल्या शिवसैनिकांसह नागरिकांनी विविध मागण्यांचे फलक आणि घोषणांच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यानंतर मोर्चा पुढे तहसीलदार कार्यालयाकडे रवाना झाला. तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी भाजपा सरकारविरोधात घोषणाबाजी करत महागाई आटोक्यात आणण्याची मागणी करण्यात आली. या सभेत माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेतकरी, महिला, सर्वसामान्य नागरिक आणि घरकुल लाभार्थ्यांच्या प्रश्नांवर भूमिका मांडली. दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी त्यांनी केली. शेतीतील वाढता खर्च, आर्थिक अडचणी आणि नैसर्गिक संकटांमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सर्वसामान्य नागरिकांच्या घरांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याच्या मुद्द्यावरही मोर्चातून आक्षेप नोंदविण्यात आला. नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, यासाठी सर्वसाधारण ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया बंद करण्याची मागणी करण्यात आली. वाढत्या महागाईमुळे आधीच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या कुटुंबांना दिलासा देण्याची गरज असल्याचे या आंदोलनातून अधोरेखित करण्यात आले. महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या अनुदानात वाढ करून पात्र महिलांना दरमहा २१०० रुपये देण्यात यावेत, अशी मागणीही अंबादास दानवे यांनी केली. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने योजनेच्या लाभाबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका मोर्चाच्या माध्यमातून मांडण्यात आली.

ग्रामीण आणि शहरी भागातील घरकुल योजनांच्या अनुदानाचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. वाढत्या बांधकाम खर्चाच्या पार्श्वभूमीवर घरकुल बांधण्यासाठी मिळणारे अनुदान अपुरे पडत असल्याची बाब मांडत, घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पाच लाख रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली. गरजू कुटुंबांना हक्काचे घर उभारता यावे, यासाठी अनुदानात वाढ करण्याची आवश्यकता असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. महागाई नियंत्रणात आणणे, शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणे, महिलांना वाढीव आर्थिक मदत उपलब्ध करून देणे आणि घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या सोडविणे अशा विविध विषयांवर या जनआक्रोश मोर्चातून आवाज उठविण्यात आला. मोर्चाच्या शेवटी अकरा प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले. संबंधित मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख योगिराज पाटील, कुलभूषण पाटील, उपजिल्हाप्रमुख रवींद्र पवार, महिला जिल्हाप्रमुख प्रतिभाताई जगदाळे, प्रल्हाद महाजन, तालुकाप्रमुख प्रमोद कोंडे, तालुका उपप्रमुख मुकेश पाटील, शाम भांबरे, तालुका संघटक संतोष महाजन, अल्पसंख्याक तालुकाप्रमुख वसीम खान, निलेश महाजन, माजी शिवसेना प्रमुख अविनाश पाटील, यावल तालुकाप्रमुख शरद कोळी आणि युवासेना तालुकाप्रमुख किरण पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक शिंदे यांनी केले.


Protected Content

Play sound