Home Cities अमळनेर अमळनेर मतदारसंघात SIR मोहीम यशस्वी करा – आ. अनिल पाटील

अमळनेर मतदारसंघात SIR मोहीम यशस्वी करा – आ. अनिल पाटील

0
16


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर विधानसभा मतदारसंघातील विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बूथप्रमुखांनी सतर्क राहून मतदार याद्यांची पडताळणी करावी. मतदार यादीतून एखाद्या पात्र मतदाराचे नाव राहिले असल्यास ते नियमानुसार समाविष्ट करून घ्यावे, तसेच नाव किंवा पत्त्यातील चुका दुरुस्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केले. अमळनेर येथील नर्मदा रिसॉर्टमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या बूथप्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आमदार अनिल पाटील होते. प्रारंभी बीएलए तालुका समन्वयक विक्रांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. तालुकाध्यक्ष भागवत पाटील आणि शहराध्यक्ष चेतन राजपूत यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आगामी काळात मतदार यादी पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत बूथस्तरावरील कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. आमदार अनिल पाटील यांनी मतदार यादीतील आकडेवारीकडे लक्ष वेधले. त्यांच्या म्हणण्यानुसार, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अमळनेर मतदारसंघात एकूण ३ लाख २ हजार ९४ मतदार होते. मात्र, SIR कार्यक्रमांतर्गत सध्याच्या प्रारूप मतदार यादीत २ लाख ५७ हजार मतदारांची नोंद आहे. याशिवाय ४४ हजार ३९० मतदारांचे मॅपिंग झालेले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यापैकी २१ हजार ६७० मतदारांच्या नावात किंवा पत्त्यात बदल असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच १२ हजार २९६ मतदार सापडत नसल्याचे आणि ३९ हजार ५९५ मतदारांची नावे कायमस्वरूपी वगळण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेतील सुनावणीचा अंतिम टप्पा सुरू असल्याने बूथप्रमुखांनी आपल्या भागातील बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांच्याशी संपर्क साधावा. प्रारूप मतदार यादी तपासून पात्र मतदारांची नावे राहिली आहेत का, नाव किंवा पत्त्यात काही त्रुटी आहेत का, याची खातरजमा करावी. आवश्यकतेनुसार संबंधित मतदारांना सुनावणी प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मदत करावी, असे आवाहन पाटील यांनी केले.

प्रारूप मतदार यादीत पात्र मतदाराचे नाव समाविष्ट नसल्यास नियमानुसार नमुना क्रमांक ६ भरून नाव नोंदणीसाठी अर्ज करता येतो. तसेच मतदार यादीतील नोंदींमध्ये दुरुस्ती किंवा इतर बदलांसाठी लागू प्रक्रियेनुसार अर्ज करावा, असे त्यांनी सांगितले. नमुना क्रमांक ८ चा वापर करून हरकत असलेली नावे कमी करून घेण्याबाबतही त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मतदार यादीशी संबंधित प्रत्येक कार्यवाही नियमानुसार आणि संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांच्या प्रक्रियेनुसार करण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित झाले. बूथ संघटन मजबूत करण्यावरही आमदार पाटील यांनी भर दिला. प्रत्येक बूथवर कार्यकर्त्यांची संख्या वाढवावी आणि सर्व स्तरांतील कार्यकर्त्यांना संघटनेत स्थान द्यावे. गाव आणि प्रभाग सक्षम करण्यासाठी बूथ पातळीवरील संघटन मजबूत असणे आवश्यक आहे. आगामी निवडणुका असोत किंवा विकासकामे, बूथप्रमुखांची भूमिका महत्त्वाची राहणार असल्याने त्यांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

अमळनेर मतदारसंघात विकासकामेही मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे सांगताना पाटील यांनी रस्त्यांचे जाळे, दुष्काळ निवारणासाठी आर्च बंधारे, पाडळसरे धरण आणि उपसा सिंचन योजनांच्या कामांचा उल्लेख केला. शहरातही विविध विकासकामे करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. बाजार समिती, शेतकी संघ आणि नगरपालिका यांसारख्या संस्थांमधील लोकप्रतिनिधींनी जनतेशी संपर्क कायम ठेवावा, लोकांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि एकजुटीने पक्षवाढीसाठी काम करावे, असेही त्यांनी सांगितले. या मेळाव्याला माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील, बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, ज्येष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील, शेतकरी संघाचे अध्यक्ष संभाजी पाटील, पारोळा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य रोहिदास पाटील (दाजी) आणि माजी पंचायत समिती उपसभापती जितेंद्र पाटील उपस्थित होते. याशिवाय बाजार समिती, शेतकरी संघ व नगरपालिकेतील लोकप्रतिनिधी, आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. युवक जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे यांनी सूत्रसंचालन केले.


Protected Content

Play sound