Home प्रशासन नगरपालिका दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर घरपट्टी, नळपट्टी माफ करा ; नगरसेविका माधुरी पाटील यांची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर घरपट्टी, नळपट्टी माफ करा ; नगरसेविका माधुरी पाटील यांची मागणी

0
14

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या मुक्ताईनगर शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी चालू आर्थिक वर्षाची घरपट्टी, नळपट्टी आणि इतर स्थानिक कर माफ करण्यात यावेत, अशी मागणी नगरसेविका माधुरी सचिन पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी १६ ऑक्टोबर २०२६ रोजी मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले असून, या मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा परिणाम शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक स्थितीवर होत आहे. पावसाअभावी शेतीचे नुकसान झाल्याने अनेक कुटुंबांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे दैनंदिन खर्च भागवताना नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नगरसेविका माधुरी पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांवर घरपट्टी, नळपट्टी आणि इतर स्थानिक करांचा आर्थिक भार पडत आहे. दुष्काळामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता नागरिकांना करांमधून सवलत देणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील नागरिकांची चालू आर्थिक वर्षाची घरपट्टी, नळपट्टी तसेच इतर लागू असलेले स्थानिक कर पूर्णपणे माफ करण्यासाठी नगरपंचायतीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या मागणीच्या अनुषंगाने नगरपंचायतीने आवश्यक ठराव मंजूर करून तो शासनाकडे पाठवावा, तसेच नियमानुसार पुढील कार्यवाही करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना आर्थिक दिलासा मिळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेने सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून या प्रश्नाकडे पाहावे, असे आवाहन माधुरी पाटील यांनी केले आहे. नगरसेविका माधुरी सचिन पाटील यांनी हे निवेदन नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना सादर केले असून, याबाबत नगराध्यक्ष संजना पाटील यांच्याकडेही मागणी मांडण्यात आल्याचे दिलेल्या माहितीत नमूद आहे. आता या मागणीवर नगरपंचायत प्रशासन कोणती भूमिका घेते, तसेच घरपट्टी, नळपट्टी आणि इतर स्थानिक करांबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविला जातो का, याकडे मुक्ताईनगरमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound