धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरालगत प्रामाणिकपणा आणि माणुसकीचे प्रेरणादायी उदाहरण समोर आले आहे. प्रवासादरम्यान एका महिलेची सोन्या-चांदीचे दागिने आणि १८ हजार रुपये रोख असलेली बॅग हरवली होती. ही बॅग कापूस व्यापारी राजेंद्र पाटील उर्फ भुऱ्या पाटील यांना आढळून आली. बॅगेतील मौल्यवान ऐवज पाहूनही कोणताही मोह न बाळगता त्यांनी संबंधित कुटुंबाचा शोध घेतला आणि पोलिसांच्या उपस्थितीत संपूर्ण ऐवज त्यांना परत केला. त्यांच्या या कृतीचे परिसरात कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्पना सोनी या आपल्या कुटुंबासह इंदूर येथून पहूर-मालखेडा मार्गे प्रवास करीत होत्या. या प्रवासादरम्यान त्यांची सोन्या-चांदीचे दागिने आणि १८ हजार रुपये रोख असलेली बॅग हरवली. प्रवासात बॅग हरवल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित कुटुंब तिचा शोध घेत होते. दरम्यान, धरणगाव शहरालगत कापूस व्यापारी राजेंद्र पाटील उर्फ भुऱ्या पाटील यांच्या दुकानासमोर ही बॅग पडलेली त्यांना दिसली. राजेंद्र पाटील यांनी बॅग उचलून आपल्या दुकानात सुरक्षित ठेवली. त्यानंतर बॅगेची तपासणी केली असता, त्यामध्ये १८ हजार रुपयांची रोकड तसेच सोन्या-चांदीचे दागिने असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. एवढा मौल्यवान ऐवज मिळूनही त्यांनी तो स्वतःकडे ठेवण्याचा कोणताही विचार न करता बॅगेच्या मालकाचा शोध घेण्याचा निर्णय घेतला.

बॅगेतील ऐवज योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने राजेंद्र पाटील यांनी तातडीने धरणगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. दुसरीकडे, हरवलेल्या बॅगेचा शोध घेत असलेले कल्पना सोनी यांचे कुटुंब राजेंद्र पाटील यांच्या दुकानापर्यंत पोहोचले. त्यानंतर राजेंद्र पाटील यांनी संबंधित कुटुंबाला सोबत घेऊन धरणगाव पोलीस स्टेशन गाठले. पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांना संपूर्ण घटनेची माहिती देण्यात आली. यावेळी १८ हजार रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने असलेली बॅग संबंधित कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आली. हरवलेला मौल्यवान ऐवज सुखरूप परत मिळाल्याने सोनी कुटुंबाने समाधान व्यक्त केले.
आजच्या काळात पैशांना आणि मौल्यवान वस्तूंना मोठे महत्त्व दिले जात असताना, राजेंद्र पाटील उर्फ भुऱ्या पाटील यांनी दाखवलेली प्रामाणिकता समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे. दुसऱ्याच्या अडचणीच्या वेळी माणुसकी जपणे आणि सापडलेला ऐवज त्याच्या मूळ मालकाला परत करणे, हाच खऱ्या प्रामाणिकपणाचा परिचय असल्याची भावना या घटनेतून व्यक्त होत आहे. या वेळी पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड, पोलीस कर्मचारी सत्यवान पवार, महेंद्र बागुल, कापूस व्यापारी राजेंद्र पाटील उर्फ भुऱ्या पाटील, शिवसेना शिंदे गटाचे गटनेते विलास भाऊ महाजन, नगरसेवक पप्पू भाऊ भावे, सामाजिक कार्यकर्ते पवन महाजन, सद्दाम भाऊ, भैय्या मराठे, दत्तू महाजन आदी उपस्थित होते.



