Home Cities रावेर रावेर तालुक्यातील ६७ गावांच्या पाणीटंचाईचा आढावा; दहा दिवसांत पुन्हा बैठक

रावेर तालुक्यातील ६७ गावांच्या पाणीटंचाईचा आढावा; दहा दिवसांत पुन्हा बैठक

0
8

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात ६७ गावांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. आमदार चंद्रकांत पाटील आणि आमदार अमोल जावळे यांनी पाणीटंचाईवरील उपाययोजना, जनावरांसाठी चारा छावण्या, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे आणि नुकसानभरपाईबाबत प्रशासनाकडून माहिती घेतली.
बैठकीत काही प्रश्नांवर अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नसल्याने संबंधित विभागांनी ठोस उपाययोजनांसह पुढील बैठकीत माहिती सादर करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तहसीलदार संजय तायडे यांनी जलसंधारण, ग्रामीण पाणीपुरवठा आणि कृषी विभागाच्या कामकाजाची माहिती दिली.
पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होण्यापूर्वीच आवश्यक उपाययोजना करून नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच शेतकरी आणि पशुपालकांना दिलासा देण्यासाठी नियोजन करावे, यावर बैठकीत भर देण्यात आला. पुढील दहा दिवसांत पुन्हा बैठक घेऊन उपाययोजनांचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या बैठकीला नगराध्यक्ष संगीता महाजन, बाजार समितीचे सभापती प्रल्हाद पाटील, तहसीलदार संजय तायडे, गटविकास अधिकारी विनोद मेढे, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश धनके, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण शिंदे, नगरसेवक पद्माकर महाजन, सावदा मंडळ प्रभारी विजय महाजन, शिवसेना पदाधिकारी राहुल पाटील, निंबोल तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील, पवन चौधरी, सामाजिक कार्यकर्ते अमोल महाजन, भाजपचे कोषाध्यक्ष अनंत महाजन (रसलपूर), भाजप कार्यकर्ते योगेश महाजन तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content

Play sound