Home Uncategorized जळगावजवळ शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे वाहन पलटी ; ८ ते १० विद्यार्थी...

जळगावजवळ शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे वाहन पलटी ; ८ ते १० विद्यार्थी जखमी

0
5

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव-छत्रपती संभाजीनगर रोडवरील उमाळा फाट्याजवळ शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे छोटा हत्ती वाहन पलटी झाल्याने ८ ते १० विद्यार्थी जखमी झाले आहेत. यातील दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमी विद्यार्थ्यांवर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू असून, गंभीर जखमींपैकी काहींना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शाळा सुटल्यानंतर आठवी, नववी आणि दहावीतील विद्यार्थी बसची वाट पाहत होते. त्याचवेळी समोरून आलेल्या एका खासगी छोटा हत्ती वाहनाला हात दाखवून विद्यार्थी कंडारी येथे जाण्यासाठी त्यात बसले. मात्र, काही अंतरावरच या वाहनाचा अपघात होऊन ते पलटी झाले. या दुर्घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले.

अपघातानंतर जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका विद्यार्थ्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. अपघाताची बातमी समजताच पालकांनी रुग्णालयात धाव घेतली. आपल्या मुलांच्या प्रकृतीची चिंता असल्याने अनेक महिला पालकांना अश्रू अनावर झाले. रुग्णालय परिसरात पालकांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, अपघात नेमका कसा झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बबन आव्हाड यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली.


Protected Content

Play sound