Home Cities अमळनेर सहा महिन्यांत अमळनेर बसस्थानकाचा चेहरामोहरा बदलणार ; अडीच कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

सहा महिन्यांत अमळनेर बसस्थानकाचा चेहरामोहरा बदलणार ; अडीच कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

0
16

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर बसस्थानकाच्या विकासकामांच्या दुसऱ्या टप्प्याचा भूमिपूजन सोहळा माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यापूर्वी आठ कोटी रुपयांच्या निधीतून सुरू असलेली कामे अंतिम टप्प्यात असून, आता आणखी अडीच कोटी रुपयांच्या निधीतून बस आगाराचे सुशोभीकरण, पेव्हर ब्लॉक बसविणे आणि रंगरंगोटी करण्यात येणार आहे. येत्या सहा महिन्यांत अमळनेर बसस्थानकाचा चेहरामोहरा बदललेला दिसेल, असा विश्वास आमदार अनिल पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

अमळनेर बसस्थानकाची पूर्वीची दुरवस्था लक्षात घेऊन आमदार अनिल पाटील यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यातून आठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. या निधीतून पार्किंग परिसराची दुरुस्ती, एसटी वर्कशॉपचे नूतनीकरण, व्यवस्थापक कार्यालय आणि व्यवस्थापक निवासस्थानाच्या नूतनीकरणासह विविध विकासकामे हाती घेण्यात आली. यापैकी बहुतांश कामे पूर्णत्वाच्या टप्प्यात आहेत. विकासकामांच्या दुसऱ्या टप्प्यात अडीच कोटी रुपयांच्या निधीतून संपूर्ण बस आगारात पेव्हर ब्लॉक बसविणे, परिसराचे सुशोभीकरण, रंगरंगोटी आणि इतर आवश्यक कामे केली जाणार आहेत. या कामांमुळे बसस्थानकाचा परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर होण्याची अपेक्षा आहे.

अमळनेर बस आगारासाठी सुमारे १०० बसेसची आवश्यकता असताना केवळ ९० बसेस उपलब्ध होत्या. त्यातील अनेक बसेस जुन्या आणि दुरवस्थेत असल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या सोडविण्यासाठी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर २० ते २२ नवीन बसेस उपलब्ध झाल्या आहेत. आणखी किमान ५० नवीन बसेस मिळाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली. एसटी बस ही ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणावर एसटीच्या सेवेवर अवलंबून असतो. ग्रामीण जनतेच्या प्रवासातील अडचणींची आपल्याला जाणीव असल्याचे सांगताना आमदार पाटील यांनी आपल्या आईचे उदाहरण दिले. त्यांची आई आजही दररोज एसटीने आपल्या गावी शेतात जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

अमळनेर बसस्थानकाजवळील नवीन प्रशासकीय इमारत आणि पंचायत समितीच्या इमारतीची कामेही पूर्णत्वाकडे जात आहेत. या इमारतींची कामे पूर्ण झाल्यानंतर ग्रामीण भागातून अमळनेरला येणाऱ्या नागरिकांना शासकीय कार्यालयांतील कामे उरकणे, बाजारपेठेत खरेदी करणे आणि पुन्हा वेळेत गावी परतणे अधिक सोयीचे होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांचा वेळ वाचावा आणि त्यांची गैरसोय कमी व्हावी, हा विकासकामांमागील उद्देश असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अमळनेर मतदारसंघात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार अनिल पाटील यांनी कार्यक्रमात सत्कार स्वीकारणे टाळले. शेतकऱ्यांच्या परिस्थितीची जाणीव ठेवत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ग्रामीण भागातून आलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आलेले भूमिपूजन. बसस्थानकात उपस्थित असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना आमदार पाटील यांनी पुढे बोलावून त्यांच्या हस्ते भूमिपूजनाचा नारळ वाढविला आणि विकासकामांचा शुभारंभ केला. शिक्षणासाठी दररोज याच बसस्थानकाचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते विकासकामांची सुरुवात झाल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या सोहळ्याला महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी-माजी नगरसेवक, शेतकी संघ व मार्केटचे पदाधिकारी, पत्रकार, एसटी महामंडळाचे कर्मचारी, युनियनचे पदाधिकारी आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यशाळा अधीक्षक प्रमोद बाविस्कर यांनी केले.


Protected Content

Play sound