Home क्राईम महामार्ग अपघातात १२ वर्षीय बालकाचा मृत्यू ; ट्रक चालकासह कंत्राटदार आणि अभियंत्यावर...

महामार्ग अपघातात १२ वर्षीय बालकाचा मृत्यू ; ट्रक चालकासह कंत्राटदार आणि अभियंत्यावर गुन्हा

0
16

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूरकडून यावलकडे जाणाऱ्या मार्गावर झालेल्या भीषण अपघातात १२ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी अज्ञात ट्रक चालकासह रस्त्याचे काम करणाऱ्या ओम कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक तसेच काम पाहणारे अभियंता किरण लाकडे यांच्या विरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास अर्जुन मुलसिंग बारेला हे त्यांचा मुलगा सलित कविराज चव्हाण याच्यासोबत एमपी-६८-एमएच-९८९४ क्रमांकाच्या हिरो स्प्लेंडर मोटारसायकलने फैजपूरकडून यावलकडे जात होते. दरम्यान, रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव आणि निष्काळजीपणे चालविण्यात येत असलेल्या अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या धडकेत १२ वर्षीय सलित कविराज चव्हाण याचा मृत्यू झाला, तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले. अपघातानंतर संबंधित ट्रक चालक घटनास्थळावरून निघून गेल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, संबंधित ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असताना आवश्यक ती खबरदारी, सूचना फलक अथवा प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पुरेशा उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. यामुळे ओम कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक आणि काम पाहणारे अभियंता किरण लाकडे यांच्यावरही जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फैजपूर पोलीस करत आहेत.

 


Protected Content

Play sound