मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भोटा उपकेंद्रांतर्गत पारंबी, हिवरे, राजुरा आणि बोरखेडा या चार गावांतील शेतकऱ्यांना मागील आठवड्यापासून रात्रीच्या वेळी शेतीसाठी वीजपुरवठा होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दुसरीकडे, परिसरातील अन्य १८ गावांना दिवसा वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चार गावांतील शेतकऱ्यांनाच रात्रीच्या अंधारात पिकांना पाणी देण्याची वेळ का येत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वीजभार अधिक असल्यामुळे वीजपुरवठ्याचे पर्यायी नियोजन केले जात असल्याचे महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले. मात्र, केवळ चार गावांनाच रात्री वीजपुरवठा का केला जात आहे, याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
रात्रीच्या वेळी शेतात पाणी देण्यासाठी जाताना वन्यप्राण्यांचा वावर, सर्पदंश आणि अपघातांचा धोका असल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. पावसाअभावी पिके वाचविण्यासाठी धडपड सुरू असताना रात्रीच्या वीजपुरवठ्यामुळे शेतीच्या कामांचे नियोजन विस्कळीत होत असल्याची तक्रार आहे.
वीजपुरवठ्याच्या वेळापत्रकामागील तांत्रिक कारणे स्पष्ट करून सर्व गावांना समान निकषांनुसार वीज द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून पारंबी, हिवरे, राजुरा आणि बोरखेडा या गावांना सकाळच्या वेळेत वीजपुरवठा सुरू करावा, अशी त्यांची मागणी आहे. अन्यथा, या प्रश्नावर आंदोलन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांकडून दिला जात आहे.



