Home Cities अमळनेर निहारिका कोळी यांच्या संशयास्पद मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी

निहारिका कोळी यांच्या संशयास्पद मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी

0
15

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । निहारिका कोळी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अमळनेर तालुक्यातील समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात शुक्रवारी, ९ ऑक्टोबर रोजी अमळनेर येथील उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

निहारिका कोळी यांच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची सखोल तपासणी करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार तातडीने कारवाई करावी, अशी भूमिका निवेदनकर्त्यांनी मांडली. तसेच, मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे निष्पन्न होणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांना तातडीने अटक करून त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तपासात कोणतीही दिरंगाई होऊ नये आणि सत्य परिस्थिती समोर यावी, यासाठी सीबीआय चौकशी करण्यात यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निहारिका कोळी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित यंत्रणेने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालावे. मृत्यूच्या परिस्थितीची सखोल तपासणी करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी समस्त अमळनेर तालुक्यातील समाज बांधवांनी केली आहे. या वेळी भूषण कोळी, रावसाहेब कोळी, भिकन कोळी, हिरामण कोळी, मधुकर सोनवणे, सागर कोळी, शरद पाटील, स्वप्निल पाटील, विनोद सोनवणे, चेतन कोळी यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते. निवेदनाद्वारे त्यांनी या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून सत्य समोर आणण्याची मागणी केली.


Protected Content

Play sound