Home क्रीडा सेंट अ‍ॅन्स हायस्कूलच्या १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड ; जिल्हास्तरीय कुडो स्पर्धेत...

सेंट अ‍ॅन्स हायस्कूलच्या १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड ; जिल्हास्तरीय कुडो स्पर्धेत दमदार कामगिरी

0
9

खामगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बुलढाणा येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय कुडो स्पर्धा २०२६-२७ मध्ये खामगाव येथील सेंट अ‍ॅन्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विभागीय स्तरावरील निवड निश्चित केली आहे. विशेष म्हणजे एका-दोन विद्यार्थ्यांची नव्हे, तर तब्बल १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड झाली असून, त्यांच्या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या गटातून चंचल सारडा, रोशनी चव्हाण आणि महिमा पिंपळे यांनी दमदार कामगिरी करत विभागीय स्तरावर प्रवेश मिळविला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटातून सूर्या माल्वंडे आणि स्वराज कदम यांची निवड झाली आहे. १४ वर्षांखालील मुलांच्या गटातून ओजस बोधे याने विभागीय स्तरासाठी पात्रता मिळवली. तर १४ वर्षांखालील मुलींच्या गटात गौरी वानखडे, शर्वरी पंजे, कीर्ती तुलापती, सायली कांबळे, गौरांगी बनसोड आणि उन्नती निमकार्डे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

जिल्हास्तरीय स्पर्धेत विविध गटांमध्ये विद्यार्थ्यांनी दाखविलेली मेहनत, कौशल्य आणि आत्मविश्वास यामुळे त्यांना पुढील स्तरावर जाण्याची संधी मिळाली आहे. या यशामागे विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन तसेच शाळेचे सहकार्य महत्त्वाचे ठरले. कुडो स्पर्धेसाठी नेहा नटकुट, आयुष मारोडे आणि क्रीडा शिक्षक नरेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व योग्य मार्गदर्शन केले. सरावादरम्यान विद्यार्थ्यांच्या तंत्रकौशल्यावर, शारीरिक तयारीवर तसेच स्पर्धात्मक आत्मविश्वास वाढविण्यावर भर देण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर रत्ना मेरी यांनी सर्व विजयी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. विभागीय स्तरावरील आगामी स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांनी त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले. यावेळी शाळेतील शिक्षक आणि शिक्षिकांनीही विभागीय स्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेतील क्रीडा क्षेत्रातील वातावरणाला चालना मिळाली असून, इतर विद्यार्थ्यांनाही विविध क्रीडा प्रकारांत सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.


Protected Content

Play sound