वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वन्यजीव सप्ताहानिमित्त चातक निसर्ग संवर्धन संस्था, वरणगाव आणि सामाजिक वनीकरण विभाग, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हतनूर धरण जलाशय परिसरात पक्षी निरीक्षण व निसर्गभ्रमंती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी व वनरक्षक, भुसावळ तालुक्यातील टहाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत निसर्ग व जैवविविधतेचा जवळून अनुभव घेतला.
हतनूर जलाशय परिसरातील पक्षीवैविध्य, पक्ष्यांचे अधिवास, स्थलांतरित पक्ष्यांचे पर्यावरणातील महत्त्व तसेच जलाशयाची पर्यावरणीय भूमिका याबाबत पक्षी अभ्यासक महाजन यांनी सहभागी अधिकारी, वनकर्मचारी आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष पक्षी निरीक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध पक्ष्यांची ओळख करून देण्यात आली. त्याचबरोबर पक्ष्यांच्या संवर्धनासाठी त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण किती महत्त्वाचे आहे, याची माहिती देण्यात आली. निसर्गभ्रमंतीदरम्यान विद्यार्थ्यांनी जलाशय परिसरातील विविध पक्ष्यांचे निरीक्षण केले. या पक्षी निरीक्षणात करड्या डोक्याची मैना, दयाळ, इंडियन रॉबिन, लहान तपकिरी होला, वेडा राघू, खाटीक, पानकावळा, ठिपकेवाली मुनिया, लाल बुड्या भांडीक, धीवर, काळा तापस, जांभळी बाणकोंबडी आणि श्वेतकंठी वटवाट्या आदी पक्ष्यांची नोंद करण्यात आली.

पक्षी निरीक्षणादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळाली. विविध पक्ष्यांचे रंग, आकार, आवाज आणि त्यांचे वर्तन याबाबत विद्यार्थ्यांनी माहिती घेतली. वर्गातील पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष निसर्गाच्या सान्निध्यातून जैवविविधतेचा अभ्यास करण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम अनुभवसमृद्ध ठरला. कार्यक्रमास सामाजिक वनीकरण विभागाचे DFO महेश झांजुर्णे, वनपरिक्षेत्र अधिकारी अजय शिंदे, पाटबंधारे विभागाचे अभियंता शशिकांत चौधरी, टहाकळी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दीपाली भंगाळे उपस्थित होत्या. तसेच चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे सचिव उदय चौधरी, समीर नेवे, सत्यपालसिंग राजपूत, डॉ. तुषार पाटील यांच्यासह अधिकारी, वनकर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
चातक निसर्ग संवर्धन संस्था सन २०१० पासून यावल वन्यजीव अभयारण्य तसेच हतनूर धरण जलाशय परिसरात पक्षी निरीक्षण, निसर्ग शिक्षण आणि जनजागृतीचे विविध उपक्रम सातत्याने राबवत आहे. या माध्यमातून पक्षी व वन्यजीवांच्या संवर्धनाबरोबरच स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी आस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पक्षी व जैवविविधतेचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवता आले. जलाशय आणि परिसरातील नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन केल्यास पक्ष्यांसह विविध जीवसृष्टीला सुरक्षित अधिवास उपलब्ध होतो, हा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला. वनकर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा सहभाग वाढल्याने भविष्यातील निसर्ग संवर्धनाच्या प्रयत्नांना निश्चितच बळ मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.



