अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, विकासात्मक उपक्रम, आधुनिक तंत्रज्ञान आणि महाराष्ट्राच्या प्रगतीची वाटचाल नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने अमळनेर येथे ‘प्रगतिशील महाराष्ट्र २०२६ – एक उत्तम राष्ट्राची ओळख’ या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ७ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत धुळे रोडवरील कलागुरु मंगल कार्यालयात हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता उदय वाघ यांच्या माध्यमातून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना सहज उपलब्ध व्हावी, शासनाच्या विकासकामांची माहिती मिळावी आणि विविध क्षेत्रांतील महाराष्ट्राची प्रगती प्रत्यक्ष पाहता यावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

या प्रदर्शनात महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध क्षेत्रांची माहिती आकर्षक पद्धतीने सादर केली जाणार आहे. कृषी व फलोत्पादन, विज्ञान व तंत्रज्ञान, संरक्षण तंत्रज्ञान, वित्त, बँकिंग व विमा, आरोग्य, वाणिज्य व व्यापार, ऊर्जा व पर्यावरण, शिक्षण, ग्राहक जागरूकता, माहिती व दूरसंचार तंत्रज्ञान, वाहतूक व रेल्वे, पर्यटन, हस्तकला व हातमाग तसेच रसायने व खते अशा विविध क्षेत्रांचा प्रदर्शनात समावेश करण्यात आला आहे.
शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक, उद्योजक तसेच विविध सामाजिक घटकांसाठी शासनाच्या योजनांची माहिती या प्रदर्शनातून उपयुक्त ठरणार आहे. विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्राथमिक माहिती, शासनाच्या उपक्रमांची दिशा आणि नागरिकांच्या जीवनावर योजनांचा होणारा परिणाम याबाबतही जनजागृती केली जाणार आहे.
कृषीपासून विज्ञान-तंत्रज्ञानापर्यंत, आरोग्यापासून शिक्षणापर्यंत तसेच ऊर्जा, पर्यावरण, वाहतूक आणि पर्यटन क्षेत्रातील विकासाची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाची व्यापक माहिती प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे.
हे प्रदर्शन ७, ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. अमळनेर शहर व तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी, युवक, शेतकरी, महिला, उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट देऊन शासनाच्या योजना व महाराष्ट्राच्या विकासाची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



