यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।यावलतालुक्याच्या सीमेवरील कोळन्हावी वन तपासणी नाक्यावर यावल पश्चिम वनविभागाने धडक कारवाई करत विनापरवाना लाकूड वाहतूक करणारे टाटा ७०९ वाहन जप्त केले. या कारवाईत वाहनासह जळाऊ लाकूड असा एकूण सुमारे ३ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल वनविभागाने ताब्यात घेतला आहे.
वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर रोजी कोळन्हावी वननाक्यावर नियमित वाहन तपासणी सुरू होती. यावेळी टाटा ७०९ ट्रक क्रमांक एमएच ०३ एन ५३०५ संशयावरून थांबवून त्याची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनातून आवश्यक परवानगीशिवाय लाकूड वाहतूक केली जात असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

वनकर्मचाऱ्यांनी वाहनातील लाकडाची पाहणी केली असता सुमारे ५ घनमीटर जळाऊ लाकूड, अंदाजे १० हजार रुपये किमतीचे, आढळून आले. त्यासोबत वाहतूक करणाऱ्या वाहनाची किंमत सुमारे ३ लाख रुपये असल्याने जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे ३ लाख १० हजार रुपये असल्याचे वनविभागाने सांगितले.
जप्त केलेला मुद्देमाल नियमानुसार यावल येथील मुद्देमाल वनकेंद्रात पावतीद्वारे जमा करण्यात आला आहे. या प्रकरणी वनगुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करून पुढील तपास वनपाल टी. वाय. देवरे, वाघझिरा यांच्याकडून करण्यात येत आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक सौरिष सहाय, यावल वनविभाग जळगाव, सहाय्यक वनसंरक्षक एस. ए. पाटील आणि यावल पश्चिम वनपरिक्षेत्र अधिकारी पी. डी. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वनपाल टी. वाय. देवरे, वनरक्षक रविकांत नगराळे, वनरक्षक एस. पी. भालेराव तसेच वाहनचालक शरद पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला.



