मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चांगदेव-मानेगाव शिवारातील पाझर तलाव क्रमांक १९१ मधून कथितरित्या सुरू असलेल्या अवैध पाणी उपसा आणि पाणी विक्रीच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. लाईव्ह ट्रेंड्स न्यूजने हा मुद्दा धडकपणे मांडताच तलाव परिसरातील अनेक मोटारी व पाइपलाइन रातोरात हटविल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईपूर्वीच या मोटारी कुणी हटवल्या? त्या नेमक्या कुणाच्या मालकीच्या होत्या? आणि इतके दिवस तलावातून पाणी उपसा सुरू असताना संबंधित यंत्रणा काय करत होती? असे संतप्त सवाल शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.
दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, गुरेढोरे आणि पशुपक्ष्यांसाठी तलावातील प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना पाझर तलावातून मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा करून त्याची कथित विक्री होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. मात्र, तक्रारी असूनही ठोस कारवाई झाल्याचे दिसून न आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आता वृत्त प्रसिद्ध होताच अचानक मोटारी हटवल्याची चर्चा असल्याने ‘कारवाई आधी की बातमीचा दणका आधी?’ असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे.

‘पाणी माफियां’ना कुणाचा आशीर्वाद?
तलावातील पाण्याच्या कथित विक्रीमागे गावातील एका राजकीय पदाधिकाऱ्याचा वरदहस्त असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. मात्र, कोणत्याही व्यक्तीचे नाव अधिकृत चौकशीशिवाय घेणे योग्य नसल्याने या चर्चेची सत्यता प्रशासनाने तपासणे गरजेचे आहे. मोटारी कोणाच्या? पाइपलाइन कुणाची? पाणी कुणाला विकले जात होते? आणि पाणी उपसा करणाऱ्यांना संरक्षण कुणाचे होते? या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाने जनतेसमोर ठेवण्याची मागणी होत आहे.
विशेष म्हणजे, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर मोटारी अचानक गायब होणे हा केवळ योगायोग आहे की कुणाला कारवाईची चाहूल लागली होती, याचाही तपास होणे आवश्यक आहे. जर मोटारी बेकायदेशीरपणे बसविण्यात आल्या होत्या, तर त्या हटविण्यापूर्वी पंचनामा करण्यात आला का? त्यांची छायाचित्रे किंवा नोंद प्रशासनाकडे आहे का? हे प्रश्नही महत्त्वाचे ठरत आहेत.
तलाव वाचला, पण प्रश्न कायम!
मोटारी आणि पाइपलाइन हटवल्यामुळे तलावातील उर्वरित पाणीसाठा काही प्रमाणात सुरक्षित राहण्याची शक्यता निर्माण झाली असून, यामुळे गुरेढोरे, पशुपक्षी आणि परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र मोटारी गायब झाल्या म्हणून प्रकरण संपलेले नाही. उलट, आता त्या मोटारी कुणाच्या होत्या आणि आतापर्यंत किती पाणी उपसले गेले, याचा हिशेब प्रशासनाने लावणे गरजेचे आहे.
लघु पाटबंधारे विभाग, महसूल प्रशासन आणि संबंधित ग्रामपंचायतीने संयुक्त पाहणी करून तलावाचे अधिकारक्षेत्र, पाणी वापराचे नियम आणि कथित पाणी उपशाची वस्तुस्थिती स्पष्ट करावी. किती दिवस पाणी उपसा करण्यात आला, कोणत्या साधनांचा वापर झाला, पाण्याची विक्री कुठे केली जात होती आणि याबाबत पूर्वी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या का, याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.
शेतकऱ्यांचा थेट सवाल—‘मोटारी गायब, मग जबाबदार कोण?’
“दुष्काळात जनावरांसाठी राखीव असलेले पाणी कुणाच्या खासगी फायद्यासाठी वापरले जात असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही,” अशी संतप्त भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. लाईव्ह ट्रेंड्स न्यूजने हा प्रश्न जनतेसमोर आणल्याबद्दल शेतकरी आणि ग्रामस्थांकडून प्रतिनिधीचे कौतुक करण्यात येत आहे.
आता प्रशासनाने केवळ मोटारी हटवल्याच्या चर्चेवर समाधान न मानता संपूर्ण पाणी उपसा प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन चौकशी करावी. दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी आणि भविष्यात तलावातील पाण्याचा अनधिकृत उपसा होणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.



