जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मराठी अभिजात भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी प्रेम, वाचनाची आवड आणि पुस्तकांशी नाते निर्माण व्हावे, या उद्देशाने कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत ‘वाचन कट्टा’ हा अनोखा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. शाळेच्या भव्य खुल्या प्रांगणात निसर्गाच्या सान्निध्यात दप्तराचे ओझे बाजूला ठेवून विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचनाचा मनमुराद आनंद घेतला.
या वाचन कट्ट्यावर विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेतील विविध कथा, गोष्टी, कविता, ऐतिहासिक चरित्रे, विज्ञानकथा तसेच महापुरुषांच्या प्रेरणादायी पुस्तकांचा संग्रह उपलब्ध करून देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीची पुस्तके निवडून त्यांचे उत्स्फूर्तपणे वाचन केले. पुस्तक वाचनासोबतच विद्यार्थ्यांनी वाचलेल्या साहित्यावर मनातील प्रश्न मांडले, विविध विषयांवर चर्चा केली आणि पुस्तकातील आवडलेल्या प्रसंगांबाबत आपले विचारही व्यक्त केले. मराठी अभिजात भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांनी बालकवी आणि कुसुमाग्रज यांच्या अजरामर कवितांचे सामूहिक सादरीकरण केले. या उपक्रमात लहान विद्यार्थ्यांसह इयत्ता नववी व दहावीतील विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत वाचन कट्ट्याचा आनंद घेतला. त्यामुळे शाळेच्या प्रांगणात वाचन, कविता आणि साहित्यचर्चेचे आनंददायी वातावरण निर्माण झाले.

या उपक्रमात शाळेतील तब्बल ३२९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना पुस्तकांशी जोडण्यासाठी आणि वाचनाची सवय विकसित करण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका संगीता पाटील यांनी सांगितले की, मराठी अभिजात भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित केलेल्या वाचन कट्ट्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषा आणि पुस्तकांविषयी प्रेम, आपुलकी व जिव्हाळा निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल. पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती विकसित होण्याबरोबरच त्यांच्या विचारांना नवी दिशा मिळण्यासही मदत होते.
शाळेचे मुख्याध्यापक एस. पी. निकम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मराठी अभिजात भाषा गौरव दिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पुस्तक वाचताना आनंद दिसून येत आहे. विद्यार्थ्यांनी केवळ एखाद्या उपक्रमापुरते मर्यादित न राहता दररोज वाचनाचा आनंद घ्यावा. वाचनामुळे ज्ञानात भर पडते, विचारशक्ती विकसित होते आणि भविष्यात आत्मविश्वासाने पुढे जाण्यास मदत होते. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी ‘वाचन कट्टा’सारखे विविध उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतात, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रेरणा, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन आदर्श शिक्षक किरण विठ्ठल पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने मराठी अभिजात भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘वाचन कट्टा’ उपक्रम संस्मरणीय ठरला.



