फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत फैजपूर येथील न्हावी मार्गावरील जे.टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांना वाव दिला.
वक्तृत्व स्पर्धेतील पहिल्या गटात इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांमधून इयत्ता तिसरीतील तन्मय गणेश चौधरी याने प्रथम क्रमांक मिळविला. इयत्ता चौथीतील चैतन्या निलेश पाटील व मानसी हर्षल आंबेकर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. दुसऱ्या गटात इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांमधून इयत्ता आठवीतील फायका इम्रान अख्तर हिने प्रथम क्रमांक मिळविला. इयत्ता सहावीतील बुशरा वसीम सय्यद हिने द्वितीय, तर श्रेया शरद शिंदे हिने तृतीय क्रमांक मिळविला.

चित्रकला स्पर्धेच्या पहिल्या गटात इयत्ता पहिली ते पाचवीमधून इयत्ता पहिलीतील आर्यन हेमंत फालक याने प्रथम क्रमांक पटकावला. इयत्ता दुसरीतील उन्नती नितीन पाटील हिने द्वितीय, तर इयत्ता पाचवीतील पूर्वा पंकज चोपडे हिने तृतीय क्रमांक मिळविला. दुसऱ्या गटात इयत्ता सहावी ते आठवीमधून इयत्ता सहावीतील ओवी राजीव बोरोले हिने प्रथम क्रमांक मिळविला. इयत्ता सातवीतील विधी छायाकांत महाजन हिने द्वितीय, तर इयत्ता आठवीतील दिव्या विकास चौधरी हिने तृतीय क्रमांक पटकावला.
चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धेबरोबरच विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून विविध सामाजिक विषयांवर जनजागृती केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कला, सादरीकरण आणि सामाजिक संदेश यांचा प्रभावी संगम साधता आला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शाळेतील वातावरणही उत्साहपूर्ण झाले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाळेत शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळादेखील घेण्यात आली. शाळेच्या कला शिक्षिका वैशाली किरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मूर्तीकलेचा अनुभव घेतला. इयत्ता दहावीतील मानस चौधरी याने आकर्षक गणेशमूर्ती साकारण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्याच्या कलाकौशल्यातून इतर विद्यार्थ्यांनाही पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याची प्रेरणा मिळाली.
स्पर्धांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्राचार्य मोझेस जाधव यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना प्राचार्य मोझेस जाधव यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना सातत्याने जोपासावे, असे मार्गदर्शन केले. पर्यवेक्षिका पूनम नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन करण्यात आले. शिक्षिका दिपाली पाटील यांनी सूत्रसंचालन केले.



