Home Cities भडगाव दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या ; भाजप किसान मोर्चाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या ; भाजप किसान मोर्चाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
20

भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसह गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू उपसा आणि शेतमालाशी संबंधित विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजप किसान मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, प्रलंबित पीक विम्याची रक्कम, जनावरांसाठी चारा छावण्या आणि रब्बी हंगामासाठी धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास मोरे, जिल्हा सरचिटणीस सोमनाथ पाटील, जिजाबराव पाटील, रत्नाकर पाटील आणि बापुराव पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. भडगाव येथील गिरणा नदीपात्रातून सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उपशामुळे भूजल पातळीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नदीपात्रातील अनियंत्रित वाळू उपशामुळे भविष्यात शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी चिंता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून वाळू उपशाला आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली. भडगाव आणि जळगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतातील तार व केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची बाबही निवेदनाद्वारे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. या घटनांना आळा घालण्यासाठी चोरट्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना सुरक्षा मिळावी, अशी मागणी करण्यात आली.

भडगावसह जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाला धोका निर्माण होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई तातडीने मिळावी, अशी मागणी किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. शेतकऱ्यांचा प्रलंबित पीक विमा तातडीने मंजूर करून संबंधित रक्कम त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करावी, अशी मागणी करण्यात आली. दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असल्याने जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

शासकीय ज्वारी खरेदी केंद्रांना मुदतवाढ देऊन शिल्लक ज्वारीची खरेदी पूर्ण करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. तसेच आगामी रब्बी हंगामातील शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी वाघूर आणि गिरणा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडावे, अशी मागणी करण्यात आली आहे. २०२३ पासून वारसाहक्काने किंवा खरेदीद्वारे जमीन मिळविलेल्या अनेक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी तसेच मुख्यमंत्री किसान योजनेचा लाभ मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली. संबंधित शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढताना अडचणी येत असल्याने या तांत्रिक व प्रशासकीय समस्या तातडीने सोडवाव्यात आणि पात्र शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

ई-पीक पाहणीच्या प्रक्रियेतही शेतकऱ्यांना अडचणी येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तलाठ्यांकडून पीक पेरा मंजूर करण्यात आल्यानंतरही संबंधित मंजुरी पोर्टलवर दिसत नसल्याच्या तक्रारी आहेत. पीक पेरा नोंदविताना लॉगिन प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करून ई-पीक पाहणीची प्रक्रिया सुलभ करावी, अशी मागणी करण्यात आली. कृषी विभागात केवळ ५८ टक्के कर्मचारी कार्यरत असून ४२ टक्के पदे रिक्त असल्याने शेतकऱ्यांची विविध कामे रखडत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे कृषी विभागातील रिक्त पदे तातडीने भरून शेतकऱ्यांना आवश्यक सेवा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. ‘मागेल त्याला सौर पंप’ योजनेअंतर्गत बसविण्यात आलेले सौर पॅनेल नैसर्गिक आपत्तीमुळे खराब झाल्यास पाच वर्षांची कंपनी गॅरंटी असूनही काही कंपन्यांकडून दुरुस्ती किंवा बदलून देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारीही यावेळी मांडण्यात आल्या. अशा प्रकरणांची प्रशासनाने दखल घेऊन शेतकऱ्यांना गॅरंटीचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

राष्ट्रीय पशुधन अभियान अर्थात NLM अंतर्गत पशुपालन व्यवसायासाठी बँकांकडून कर्ज मंजूर करताना लावण्यात येणाऱ्या जाचक अटी शिथिल कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली. पशुपालनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालकांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे कर्जप्रक्रिया सुलभ करून पात्र लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, अशी भूमिका निवेदनाद्वारे मांडण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष कमलाकर रोटे, मनोहर पाटील, सच्चिदानंद चव्हाण, किशोर नारखेडे, घनश्याम पाटील, किसन पाटील, जिल्हा चिटणीस अरुण पाटील, कुंदनसिंग पाटील, संजय पाटील, भगवान पाटील, पारोळा तालुकाध्यक्ष भरत पाटील, कैलास पाटील, प्रमोद पाटील यांच्यासह किसान मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound