Home करियर जळगावात ‘रोजगार महाकुंभ’! गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात रोजगाराच्या संधींचा मेळावा

जळगावात ‘रोजगार महाकुंभ’! गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात रोजगाराच्या संधींचा मेळावा

0
26

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, डॉ. केतकीताई पाटील फाउंडेशन आणि गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभा’चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून युवकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासह कौशल्य विकास आणि उद्योजकतेला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त संदीप गायकवाड, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार पाटील, डॉ. प्रशांत वारके, उद्योजक मानस बोरोले, महेश चौधरी, सुनील भंगाळे तसेच कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे ओएसडी मनोज महाजन उपस्थित होते. रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना विविध क्षेत्रातील रोजगाराच्या संधी एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळवून देणे आणि कौशल्याच्या आधारे रोजगाराच्या संधी वाढविणे हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

मेळाव्यात विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधींबाबत उमेदवारांना माहिती देण्यात आली. तसेच कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकतेशी संबंधित मार्गदर्शन मिळण्याची संधी सहभागी युवकांना मिळाली. जिल्ह्यातील तरुणांना रोजगारक्षम बनविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले. जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी रोजगार मेळाव्याची पाहणी करून आयोजकांकडून उपक्रमाची माहिती घेतली. युवकांनी उपलब्ध संधींचा लाभ घेत कौशल्यविकासावर भर द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


Protected Content

Play sound