Home धर्म-समाज सावद्यात भुलाबाई महोत्सवाचा जल्लोष ; तीन गटांत रंगली स्पर्धा

सावद्यात भुलाबाई महोत्सवाचा जल्लोष ; तीन गटांत रंगली स्पर्धा

0
13


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारंपरिक लोकसंस्कृतीचा वारसा जपत नव्या पिढीला भुलाबाईच्या लोकपरंपरेशी जोडण्याचा सुंदर प्रयत्न सावदा येथे पाहायला मिळाला. केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला संवर्धिनी आणि गोदावरी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे भव्य भुलाबाई महोत्सव उत्साहात पार पडला. तीन गटांमध्ये तब्बल १६ संघांनी सहभाग नोंदवत पारंपरिक भुलाबाई गीतांना आधुनिकतेची जोड देत विविध सामाजिक संदेश प्रभावीपणे सादर केले.

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात आयोजित या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य भारती महाजन होत्या. प्रमुख अतिथी म्हणून साई प्रसाद पुस्तकालयाच्या शुभांगी आखाडे, निकिता जाधव आणि पल्लवी निकुंभ उपस्थित होत्या. स्पर्धेचे परीक्षण केशव स्मृती प्रतिष्ठानच्या डॉ. पूजा महाजन, देवयानी कोल्हे आणि कोरिओग्राफर सचिन भिडे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी गोदावरी फाऊंडेशनच्या प्रेरणास्थान स्व. गोदावरी पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भुलाबाईच्या मूर्तीचे विधिवत पूजन व आरती करण्यात आली. पारंपरिक वातावरणात सुरू झालेल्या महोत्सवात विविध शाळा आणि संघांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

सावदा येथे तालुकास्तरीय भुलाबाई महोत्सवाचे यंदाचे दुसरे वर्ष होते. परिसरातील विविध गावांमधील लहान-मोठ्या शाळांनी या महोत्सवात सहभाग नोंदविला. भुलाबाईच्या पारंपरिक गीतांचे सादरीकरण करताना स्पर्धकांनी त्याला आधुनिकतेची जोड दिली. आकर्षक वेशभूषा, तालबद्ध नृत्य आणि विविध संदेशांमुळे सादरीकरणांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.स्पर्धेसाठी वयोगटानुसार तीन स्वतंत्र गट करण्यात आले होते. पहिल्या लहान गटात ३ ते १० वर्षे वयोगटातील स्पर्धकांचा समावेश होता. मोठ्या गटात ११ ते १६ वर्षे वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग घेतला, तर १७ वर्षांपासून पुढील मुली व महिलांसाठी खुला गट ठेवण्यात आला होता. महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व संघांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

लहान गटामध्ये मायक्रो व्हिजन अकॅडमी, रावेर या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. जिल्हा परिषद शाळा, वडगाव संघाने द्वितीय, तर जिल्हा परिषद शाळा, वाघोदा संघाने तृतीय क्रमांक मिळविला. शिक्षण प्रसारक मंडळ प्राथमिक विद्या मंदिर, न्हावी या संघाला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. मोठ्या गटामध्ये यजमान डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सावदा संघाने प्रथम क्रमांकावर बाजी मारली. मायक्रो व्हिजन अकॅडमी, रावेर संघाने द्वितीय, तर उमरेश्वर माध्यमिक विद्यालय, दसनूर संघाने तृतीय क्रमांक पटकावला. भारत विद्यालय, न्हावी संघाला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. खुल्या गटात भारत विद्यालय, न्हावी संघाने प्रथम क्रमांक मिळविला, तर शिवकन्या मंडळ, साकळी (ता. यावल) संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. रोकडोबा हनुमान मंदिर मंडळ, कोचूर या संघाला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विजेत्या संघांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके व बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी सावदा येथील नगरसेविका रेखा वानखेडे, प्रतीक्षा भंगाळे, भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षा रेखा बोंडे, फैजपूरच्या नगरसेविका जयश्री चौधरी, रावेर महिला मोर्चा अध्यक्षा आशा कोळी, बेटी बचाव बेटी पढावच्या संयोजिका सारिका चव्हाण, नंदिनी पंत, रावेरच्या नगरसेविका अर्चना पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी साई प्रसाद पुस्तकालयाचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले, तर रेखा बोंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. पारंपरिक भुलाबाई गीतांचा गोडवा, आधुनिक सादरीकरण आणि बालकांपासून महिलांपर्यंतचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे सावद्यातील भुलाबाई महोत्सव रंगतदार ठरला. १६ संघांच्या सहभागातून लोककला आणि संस्कृतीचे संवर्धन करत नव्या पिढीपर्यंत भुलाबाईची परंपरा पोहोचविण्याचा संदेश या महोत्सवातून देण्यात आला.


Protected Content

Play sound