
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट व लेखक डॉ. जानकीराम तळेले लिखित ‘होमिओपॅथी सायंटिफिक केस स्टडीज विथ मटेरिया मेडिका’ या पुस्तकाच्या व्हॉल्यूम १ व २चे प्रकाशन उत्साहात झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध क्लिनिकल केस स्टडीजचे शास्त्रीय पद्धतीने सादरीकरण केले.

मान्यवरांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशन
डॉ. केतकी पाटील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आणि लेखक डॉ. जानकीराम तळेले यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी संचालक डॉ. एन. एस. अर्विकार, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोलंके, प्राचार्य डॉ. विद्यानंद आठवले यांच्यासह वैद्यकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचे क्लिनिकल केस स्टडी सादरीकरण
दिपेश सोनवणे, आकाश गायकवाड, साक्षी औलगले (पाटील), निदा खान आणि अबिना किदवाई यांनी विविध क्लिनिकल केस स्टडीज सादर केल्या. त्यांनी केस हिस्ट्री, निदान प्रक्रिया, उपचारपद्धती आणि औषधांच्या निवडीबाबत माहिती दिली. या सादरीकरणातून विद्यार्थ्यांचा चिकित्सक दृष्टिकोन आणि विषयातील अभ्यास अधोरेखित झाला.
४० वर्षांच्या अनुभवातून पुस्तकाची निर्मिती
डॉ. जानकीराम तळेले गेल्या सुमारे ४० वर्षांपासून होमिओपॅथीच्या अभ्यास व प्रॅक्टिसशी जोडलेले आहेत. विविध रुग्णांच्या केस स्टडीज आणि दीर्घ वैद्यकीय अनुभवातून या पुस्तकांची निर्मिती झाली आहे. मटेरिया मेडिका आणि क्लिनिकल अनुभवाची सांगड घालण्याचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वैद्यकीय ज्ञानासोबत चिकित्सक विचारसरणी, सादरीकरण कौशल्य आणि संशोधनाभिमुख दृष्टिकोन विकसित करण्याची संधी मिळाली.



