Home Cities जळगाव जळगाव दूध संघाकडून दूध उत्पादकांना ५० पैसे भावफरक मंजूर; संघाला १.८८ कोटींचा...

जळगाव दूध संघाकडून दूध उत्पादकांना ५० पैसे भावफरक मंजूर; संघाला १.८८ कोटींचा नफा

0
14


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची सन २०२५-२६ या वर्षाची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २७ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, महाबळ रोड, जळगाव येथे चेअरमन आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर ५० पैसे भावफरक देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

सभेला मंत्री गुलाबराव पाटील, रोहित निकम, माजी आमदार दिलीप वाघ, संचालक संजय पवार यांच्यासह संघाचे संचालक, अधिकारी आणि जिल्ह्यातील सुमारे ४९३ संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.सभेत दुष्काळी परिस्थितीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना किमान एक ते दोन रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी आणि चाऱ्याचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन केले. जिल्ह्यात सुमारे १५१ दिवस पुरेल इतकाच चारा उपलब्ध असल्याचे सांगत चारा व्यवस्थापनावर भर देण्याचे त्यांनी नमूद केले. तसेच दूध संकलनातील घट रोखण्यासाठी कारणांचा शोध घेण्याचे आवाहन केले.

चेअरमन मंगेशदादा चव्हाण यांनी संघाच्या आर्थिक प्रगतीची माहिती देताना सांगितले की, २०२२-२३ मध्ये संघाला ६.७२ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. मात्र, २०२५-२६ मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सांडपाणी प्रकल्प आणि प्रशिक्षण केंद्राच्या नूतनीकरणासह विविध कामे करूनही संघाला १.८८ कोटी रुपयांचा नफा झाला.

सभेत उत्कृष्ट संस्था, सदस्य व कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. दीर्घकाळ सेवा देणाऱ्या ज्येष्ठ सचिवांचाही सन्मान करण्यात आला. सभा शांततेत पार पडली.

 


Protected Content

Play sound