


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।भारतीय संस्कृती, परंपरा आणि उत्सवांची ओळख परदेशातही जपली जावी, या उद्देशाने पोलंडमधील व्रात्स्वोव शहरात महाराष्ट्र मंडळ पोलंडतर्फे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या उत्सवाला २५० हून अधिक नागरिकांनी उपस्थित राहून गणरायाचे दर्शन घेतले. भारतीयांसह स्थानिक पोलिश नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने उत्सवाला बहुसांस्कृतिक स्वरूप प्राप्त झाले.
पोलंडमध्ये विविध राज्यांतून स्थायिक झालेल्या भारतीय नागरिकांनी एकत्र येत गणेशोत्सवाचा आनंद घेतला. मराठी समाजासोबतच इतर भारतीय भाषिक समुदाय तसेच स्थानिक पोलिश नागरिकांनी कार्यक्रमात सहभाग घेत भारतीय संस्कृती आणि गणेशोत्सवाची परंपरा अनुभवली. त्यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता भारतीय समुदायाला एकत्र आणणारा आणि स्थानिक नागरिकांशी सांस्कृतिक नाते दृढ करणारा उपक्रम ठरला.
या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे मराठी कलाकारांनी स्थानिक मातीपासून हाताने तयार केलेली सुंदर आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती. जयती देवरे यांनी हाताने साकारलेली ही गणेशमूर्ती उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत होती. पारंपरिक पद्धतीने गणेशमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर आरती आणि गणरायाच्या भक्तिमय वातावरणात उत्सवाला सुरुवात झाली.
गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांनी गाणी आणि नृत्यांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. त्याचबरोबर इतर भाषिक समुदायातील नागरिकांनीही विविध गाण्यांवर नृत्यप्रस्तुती सादर केली. भारतीय संस्कृतीतील विविधतेचे दर्शन घडविणाऱ्या या कार्यक्रमांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
परदेशात राहूनही भारतीय सण, संस्कृती आणि परंपरांशी असलेले नाते जपण्याचे काम महाराष्ट्र मंडळ पोलंडच्या माध्यमातून सातत्याने केले जात आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध प्रांत आणि भाषिक समुदायांतील भारतीय एकत्र आले. त्याचबरोबर पोलंडमधील स्थानिक नागरिकांनाही भारतीय परंपरेचा जवळून परिचय करून घेण्याची संधी मिळाली.
“गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून भारतीय सार्वभाषिक आणि सर्वप्रांतिक समाजाला एकत्र आणणारा, तसेच पोलंडमधील स्थानिक नागरिकांपर्यंत भारतीय संस्कृती पोहोचवणारा दुवा आहे. विविध भाषिक आणि विविध प्रांतातील लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात, हीच खरी परंपरेची ताकद आहे,” अशी भावना महाराष्ट्र मंडळ पोलंडच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
उत्सवाच्या यशस्वितेसाठी वैभव आणि समीक्षा सानप, तुषार आणि पूजा ओस्तवाल, पुनम आणि धिरज पाटील, सविता आणि अभिजित क्षीरसागर, गिरीश सुळे, अजय ओतारी, महेंद्र यादव, क्षितिज केळकर यांच्यासह महाराष्ट्र मंडळाच्या सर्व उत्साही कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजन आणि सहकार्यामुळे गणेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
पोलंडच्या भूमीत भारतीय संस्कृतीचा सुगंध दरवळवणाऱ्या या गणेशोत्सवातून विविध राज्यांतील भारतीयांना एकत्र येण्याची संधी मिळाली, तर स्थानिक पोलिश नागरिकांनाही भारतीय परंपरा आणि सांस्कृतिक वैविध्याचा अनुभव घेता आला. त्यामुळे व्रात्स्वोवमधील हा गणेशोत्सव भारतीय संस्कृतीच्या जागतिक प्रसाराचा सुंदर अनुभव ठरला.



