


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जळगाव येथे जिल्हास्तरीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. गावपातळीवर लोकसहभाग वाढविणे, समुदायामध्ये आरोग्यविषयक मालकीची भावना निर्माण करणे तसेच स्थानिक प्रश्नांवर सामूहिक कृतीला चालना देण्याच्या मुख्य उद्देशाने ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत वर्तनबदल संवाद , सहभागी पद्धती आणि ट्रिगर अॅक्टिव्हिटीज या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर उपस्थित अधिकारी व कर्मचार्यांना सखोल मार्गदर्शन पुरवण्यात आले.
कार्यशाळेत राज्यस्तरीय मुख्य प्रशिक्षक तथा ‘Action for Better Tomorrow Society’, छत्तीसगडचे संचालक राजू गुट्टे यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. या प्रसंगी पारंपरिक व्याख्यान पद्धतीला फाटा देत सहभागी व अनुभवाधारित प्रशिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात आला. यामध्ये ‘आइस ब्रेकर’ उपक्रम, गटचर्चा, जोड्या व गटांमधील सराव, प्रश्नोत्तर सत्रे, परिस्थितीआधारित कृती आणि सामूहिक चिंतन अशा विविध उपक्रमांचा समावेश होता. या माध्यमातून “माहिती देणे → विचारप्रवृत्त करणे → अनुभवातून जाणीव निर्माण करणे → कृतीसाठी प्रेरित करणे” या प्रक्रियेचे महत्त्व पटवून देण्यात आले. समुदायाला केवळ माहिती न देता स्थानिक समस्या व गरजा समजून घेऊन त्यांना उपायांमध्ये सक्रिय भागीदार बनविण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
राजू गुट्टे यांनी ट्रिगर अप्रोचच्या माध्यमातून समुदायात आरोग्यविषयक विषयांवर विचारप्रवर्तन आणि स्वयंस्फूर्त कृती कशी घडवून आणावी, याचे प्रात्यक्षिक स्पष्ट केले. केवळ सूचना किंवा आदेश देण्याऐवजी प्रश्न, संवाद आणि सहभागी कृतीतून ग्रामस्थांना स्वतःहून पुढाकार घेण्यासाठी प्रेरित करण्यावर भर देण्यात आला. विविध उपक्रमांनंतर प्रशिक्षणार्थींसोबत हे प्रयोग गावपातळीवर कसे राबवता येतील आणि समुदायाच्या सहभागासाठी कोणते घटक महत्त्वाचे आहेत, यावर सविस्तर मंथन झाले.
कार्यशाळेच्या उत्तरार्धात तालुकास्तरीय कृती आराखडा तयार करण्यात आला. ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाच्या राज्यस्तरीय पीएमयू टीमचे गोविंद मोरे व अक्षयकुमार राऊतवाड आणि संबंधित अधिकाऱ्यांनी गटचर्चेच्या माध्यमातून स्थानिक गरजा, उपलब्ध संसाधने, संभाव्य अडचणी आणि विविध विभागांची भूमिका यांचा विचार करून अंमलबजावणीची रणनीती ठरवली. प्रत्येक गटाने तयार केलेले आराखडे सादर केले, ज्यामुळे क्षेत्रीय अनुभव व कल्पक विचारांची देवाणघेवाण होऊन ‘पीअर लर्निंग’ला मोठी चालना मिळाली.
गावाचे आरोग्य ही केवळ आरोग्य विभागाची एकट्याची जबाबदारी नसून ग्रामपंचायत, महिला व बालविकास, शिक्षण, पाणी व स्वच्छता विभाग आणि स्थानिक समुदाय यांच्या संयुक्त समन्वयातूनच शाश्वत सुधारणा शक्य आहे, असा निष्कर्ष या कार्यशाळेत काढण्यात आला. लोकसहभाग, आंतरविभागीय समन्वय, स्थानिक कृती आराखडा, नियमित फॉलो-अप आणि मॉनिटरिंग ही या अभियानाची मुख्य सूत्रे असल्याचे स्पष्ट करण्यात आले.



