Home Cities यावल केळी पीकविमा : पात्र महसूल मंडळांची यादी तातडीने जाहीर करा ; यावल...

केळी पीकविमा : पात्र महसूल मंडळांची यादी तातडीने जाहीर करा ; यावल शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

0
25


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना २०२५-२६ अंतर्गत केळी पिकासाठी विमा परताव्यास पात्र ठरलेल्या महसूल मंडळांची यादी तातडीने जाहीर करावी आणि पात्र शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या यावल तालुका शाखेने केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, जळगाव यांना निवेदन देण्यात आले असून, मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यातील हजारो केळी उत्पादक शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना २०२५-२६ अंतर्गत आपल्या केळी पिकाचा विमा उतरवला आहे. या योजनेचा अधिकृत विमा संरक्षण कालावधी ३१ जुलै २०२६ रोजी संपुष्टात आला आहे. नियमानुसार विमा कालावधी संपल्यानंतर ४५ दिवसांच्या आत हवामानाच्या ट्रिगरनुसार पात्र ठरणाऱ्या महसूल मंडळांची यादी घोषित होणे अपेक्षित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, निर्धारित कालावधी उलटून गेल्यानंतरही प्रशासनाकडून पात्र महसूल मंडळांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आलेली नसल्याचा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला आहे. त्यामुळे विमा भरलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, विमा परतावा नेमका कधी मिळणार, याबाबत शेतकऱ्यांमध्ये असंतोष असल्याचे निवेदनात म्हटले आहे. नैसर्गिक संकटे, अवेळी पाऊस तसेच बदलत्या हवामानामुळे केळी उत्पादक शेतकरी आधीच आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि प्रतिकूल हवामानाचा पिकावर होणारा परिणाम यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत पात्र शेतकऱ्यांना विमा परतावा वेळेत न मिळाल्यास त्यांच्यासमोरील आर्थिक संकट आणखी गंभीर होऊ शकते, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.

यावल तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात हवामान निर्देशांकानुसार विमा परताव्यास पात्र ठरलेल्या सर्व महसूल मंडळांची यादी पुढील चार ते पाच दिवसांत ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने जाहीर करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या महसूल मंडळाची स्थिती सहजपणे समजू शकेल, अशा पारदर्शक पद्धतीने ही माहिती उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे. यासोबतच नवीन आणि जुन्या महसूल मंडळांमधील हवामान केंद्रांवर नोंदविण्यात आलेले तापमान, वाऱ्याचा वेग आणि पर्जन्यमान यांची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यावी. हवामानाच्या कोणत्या निकषांच्या आधारे संबंधित महसूल मंडळ विमा भरपाईस पात्र किंवा अपात्र ठरले, याबाबत स्पष्टता असावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

अवेळी पाऊस आणि हवामानातील बदलांमुळे नुकसान सहन करणाऱ्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना विमा भरपाई देण्यात संबंधित विमा कंपनीकडून टाळाटाळ अथवा अनावश्यक विलंब होत असल्यास प्रशासनाने त्याची गंभीर दखल घ्यावी. तसेच संबंधित विमा कंपनीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. प्रशासन आणि संबंधित विमा कंपनीने या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करून पात्र महसूल मंडळांची यादी जाहीर न केल्यास यावल तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या निवेदनावर लोकनियुक्त नगराध्यक्षा छायाताई अतुल पाटील, तालुकाप्रमुख शरद कोळी, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील, शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, संतोष धोबी, नगरसेवक सागर चौधरी, पराग सराफ, वैशाली बारी, कडू पाटील, योगेश पाटील, योगेश चौधरी, सारंग बेहेडे, सुनील जोशी, आर. के. चौधरी, किशोर माळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Protected Content

Play sound