Home Cities जळगाव दुष्काळसदृश्य स्थितीत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतपिकांची पाहणी

दुष्काळसदृश्य स्थितीत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतपिकांची पाहणी

0
12


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील काही भागांत निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिकांची सद्यस्थिती, वाढ, उत्पादनक्षमतेवरील परिणाम आणि संभाव्य उत्पादनाचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी भुसावळ व जामनेर तालुक्यांतील विविध गावांमध्ये बुधवारी प्रत्यक्ष पाहणी केली. मौजे फेकरी येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कापूस पिकाच्या पहिल्या वेचणीचा पीक कापणी प्रयोग घेण्यात आला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी उपस्थित होते.

फेकरी येथे घेण्यात आलेल्या कापूस पीक कापणी प्रयोगाची जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी स्वतः कापूस वेचणी करून प्रयोगाच्या प्रक्रियेची माहिती घेतली. या प्रयोगातून प्राप्त झालेल्या कापूस उत्पादनाची नोंद सीसीई प्रणालीमध्ये करण्यात आली. तसेच विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत उत्पादनाची नोंद घेण्यात आली.

पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतातील उत्पादनाचा वस्तुनिष्ठ अंदाज घेण्यास मदत होते. त्यामुळे दुष्काळसदृश्य परिस्थितीचा पिकांच्या उत्पादनावर झालेला परिणाम आणि संभाव्य उत्पादनस्थिती समजून घेण्यासाठी या प्रयोगाला महत्त्व आहे. संकलित करण्यात येणारी उत्पादनविषयक माहिती पुढील प्रशासकीय कार्यवाहीसाठी उपयोगी ठरणार आहे.

यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कुऱ्हापानाचे येथे कापूस, सोयाबीन आणि मका पिकांच्या प्रक्षेत्रांची पाहणी केली. यावेळी पिकांची वाढ, सद्यस्थिती, शेतातील उपलब्ध ओलावा आणि संभाव्य उत्पादनाबाबत त्यांनी शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. दुष्काळसदृश्य परिस्थितीचा पिकांवर नेमका किती परिणाम झाला आहे, याबाबत क्षेत्रीय स्तरावर माहिती संकलित करण्यात आली.

चोरवड येथेही सोयाबीन आणि मका पिकांची पाहणी करण्यात आली. पिकांची वाढ आणि शेतातील परिस्थितीचा आढावा घेताना शेतकऱ्यांशी संवाद साधून उत्पादनाबाबतची माहिती जाणून घेण्यात आली. प्रत्यक्ष शेतपातळीवरील परिस्थिती समजून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध पिकांच्या प्रक्षेत्रांना भेट दिली.

जामनेर तालुक्यातील महुखेडा येथे मका, सोयाबीन आणि तूर पिकांची पाहणी करण्यात आली. उपलब्ध ओलावा, पिकांची वाढ, पिकांवरील परिस्थितीचा परिणाम आणि संभाव्य उत्पादन याबाबत क्षेत्रीय पाहणीद्वारे माहिती घेण्यात आली. विविध पिकांच्या सद्यस्थितीची नोंद करण्यावर प्रशासनाचा भर राहिला.


Protected Content

Play sound