Home Cities यावल एकनाथ खडसेंची किनगावातील इंग्लिश निवासी स्कूलला सदिच्छा भेट; जुन्या स्नेहबंधांना पुन्हा उजाळा

एकनाथ खडसेंची किनगावातील इंग्लिश निवासी स्कूलला सदिच्छा भेट; जुन्या स्नेहबंधांना पुन्हा उजाळा

0
12


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्याचे माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे हे एका कार्यक्रमानिमित्त किनगाव येथे आले असता त्यांनी डोणगाव-किनगाव रोडवरील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी शाळेची पाहणी करत शाळेचे चेअरमन व्ही.डी. पाटील यांच्याशी संवाद साधला. या भेटीच्या निमित्ताने खडसे आणि पाटील कुटुंबीयांमधील जुने पारिवारिक व मैत्रीपूर्ण संबंध पुन्हा अधोरेखित झाले.

इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलचे चेअरमन व्ही.डी. पाटील यांनी अन्न व औषध प्रशासन विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून सेवा बजावत असताना एकनाथराव खडसे यांच्याशी त्यांचे पारिवारिक आणि मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. सेवाकाळापासूनच दोन्ही कुटुंबांमध्ये स्नेहाचे संबंध असून, सुख-दुःखाच्या प्रसंगी एकमेकांच्या सोबत राहण्याची परंपरा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

याच स्नेहबंधांना उजाळा देत एकनाथराव खडसे यांनी किनगाव येथील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलला भेट दिली. शाळेच्या परिसरात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या निवासी सुविधा तसेच शाळेच्या कामकाजाबाबत माहिती घेतली.

शाळेला भेट दिल्यानंतर खडसे यांनी व्ही.डी. पाटील यांच्या निवासस्थानीही सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा झाली. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यस्ततेतून वेळ काढून जुन्या स्नेहसंबंधांची जपणूक करण्याच्या या भेटीमुळे उपस्थितांमध्येही आपुलकीचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रोहिणीताई खडसे, इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलच्या उपाध्यक्ष शैलेजाताई विजयकुमार पाटील, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती रविंद्र ऊर्फ छोटूभाऊ सूर्यभान पाटील, डॉ. विजय बोरसे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

किनगाव येथील या भेटीमुळे एकनाथराव खडसे आणि व्ही.डी. पाटील यांच्यातील जुने पारिवारिक व मैत्रीपूर्ण संबंध पुन्हा चर्चेत आले. शैक्षणिक संस्थेला दिलेल्या या सदिच्छा भेटीच्या निमित्ताने शाळेच्या पदाधिकाऱ्यांसह उपस्थित मान्यवरांनीही खडसे यांच्याशी संवाद साधला.

 


Protected Content

Play sound