


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जळगाव रेल्वे स्थानकावर ५व्या रेल्वे मार्गाच्या कनेक्टिव्हिटीचे महत्त्वपूर्ण काम हाती घेण्यात येणार आहे. या तांत्रिक कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष ब्लॉक घेण्यात येणार असून, २३ आणि २४ सप्टेंबर २०२६ रोजी भुसावळ विभागातून धावणाऱ्या तब्बल १२ महत्त्वाच्या रेल्वेगाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे ऐन सणासुदीच्या किंवा प्रवासाच्या काळात उत्तर महाराष्ट्र व खान्देशातील प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जळगाव ते भुसावळ दरम्यानच्या ५व्या रेल्वे लाईनचे काम वेगाने सुरू असून, हे काम मुख्य मार्गाशी जोडण्यासाठी (कनेक्टिव्हिटी) हा ब्लॉक अत्यंत आवश्यक मानला जात आहे. या कामामुळे गाड्यांचे वेळापत्रक प्रभावित होणार असून, प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन आधीच करून ठेवावे, असे स्पष्ट निर्देश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत. २३ सप्टेंबर रोजी सुरत-भुसावळ एक्सप्रेस (१९००७), उधना-भुसावळ मेमू (१९१०५), भुसावळ-उधना मेमू (१९१०६), भुसावळ-देवळाली मेमू (११११४) आणि बडनेरा-नाशिक रोड मेमू (६११३०) या गाड्या रद्द राहणार आहेत.
त्याचप्रमाणे २४ सप्टेंबर रोजी भुसावळ-सुरत एक्सप्रेस (१९००८), नंदुरबार-भुसावळ पॅसेंजर (५९०७५), भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर (५९०७६), इगतपुरी-भुसावळ मेमू (११११९), भुसावळ-इगतपुरी मेमू (१११२०), देवळाली-भुसावळ मेमू (११११३) आणि नाशिक रोड-बडनेरा मेमू (६११२९) या गाड्यांच्या फेऱ्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. रोजच्या प्रवाशांसह नोकरदार वर्ग आणि विद्यार्थ्यांवर याचा थेट परिणाम होणार आहे.



