Home Cities जळगाव रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती ; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा...

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती ; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

0
29


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्नेहल प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या २५ वर्षांपासून पारंपरिक, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यंदा प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष असून, ‘॥ पिंप्राळ्याचा राजा ॥’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणरायाच्या उत्सवात यंदा पर्यावरण संवर्धनासह समाजप्रबोधन आणि सामाजिक उपक्रमांचा संदेश देण्यात येत आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक व मंडळाचे नेतृत्व करणारे अजिंक्य कमलाकर देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जळगाव शहरातील गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक परंपरेला पिंप्राळा उपनगराशी जोडणारे महत्त्वाचे माध्यम म्हणून स्नेहल प्रतिष्ठानची ओळख निर्माण झाली आहे. गेल्या २५ वर्षांत भक्ती, परंपरा, सामाजिक बांधिलकी आणि लोकसहभाग यांची सांगड घालत प्रतिष्ठानने गणेशोत्सवाची वाटचाल सुरू ठेवली आहे. यंदाच्या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे केळीच्या खोडापासून साकारण्यात आलेली पर्यावरणपूरक गणेशमूर्ती. जळगाव जिल्ह्याचे वैशिष्ट्य असलेल्या केळीच्या खोडाचा वापर करून सलग दुसऱ्या वर्षी ‘पिंप्राळ्याचा राजा’ची मूर्ती तयार करण्यात आली आहे. ठाकूर ब्रदर्स यांच्या हस्ते ही मूर्ती साकारण्यात आली आहे. या पर्यावरणपूरक मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर ती साधारण १२ ते १८ तासांत पाण्यात पूर्णपणे विरघळते. मूर्ती विरघळल्यानंतर त्यातील घटक माशांसाठी खाद्यरूपात उपलब्ध होत असल्याने पाण्याचे प्रदूषण टाळण्यास मदत होते. श्रींच्या मूर्तीचे विसर्जन भावभक्तीने आणि सनातन परंपरेनुसार व्हावे, त्यानंतर मूर्तीची अवहेलना होऊ नये तसेच विसर्जनामुळे निसर्गाला कोणतीही हानी पोहोचू नये, या उद्देशाने पर्यावरणपूरक मूर्तीची संकल्पना राबविण्यात आली आहे.

स्नेहल प्रतिष्ठानकडून गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सवात डीजेला फाटा देण्यात आला आहे. ‘पिंप्राळ्याचा राजा’च्या आगमन सोहळ्यापासून ते सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीपर्यंत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिले जाते. मागील वर्षी विसर्जन मिरवणुकीत भजनांच्या तालावर जळगावकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. गणेशोत्सव आणि सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीत महिलांनाही नेतृत्वाची संधी दिली जात असल्याने त्यांचा लक्षणीय सहभाग पाहायला मिळतो. गणेशोत्सवाच्या माध्यमातून गेल्या २५ वर्षांपासून प्रतिष्ठानतर्फे समाजप्रबोधनात्मक कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. वारकरी संप्रदायातील नामवंत ७७ कीर्तनकारांची कीर्तने या कालावधीत आयोजित करण्यात आली आहेत. कीर्तन महोत्सवादरम्यान सेवा देणाऱ्या विविध वारकरी शिक्षण संस्थांना विद्यार्थ्यांच्या उपयोगासाठी सहकार्य करण्याचे कामही प्रतिष्ठानकडून केले जाते.

सामाजिक बांधिलकी जपत प्रतिष्ठानतर्फे गेल्या २५ वर्षांपासून नेत्रतपासणी शिबिरे, चष्मे वाटप आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. हिवाळ्यात गरजू नागरिकांना ब्लँकेटचे वाटप, तर दिवाळीच्या काळात गरजू कुटुंबांना फराळ आणि मिठाईचे वाटप केले जाते. या उपक्रमांमधून गणेशोत्सवाला सामाजिक सेवेची जोड देण्याचा प्रयत्न सातत्याने करण्यात आला आहे. याशिवाय जळगाव शहरातील विविध सामाजिक उपक्रमांमध्येही स्नेहल प्रतिष्ठानचा सातत्यपूर्ण सहभाग राहिला आहे. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त यंदाच्या गणेशोत्सवातून भक्ती आणि परंपरेसोबतच समाजप्रबोधन, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound