Home Cities यावल यावल महाविद्यालयात हिंदी सप्ताह उत्साहात; विविध साहित्यिक स्पर्धांत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

यावल महाविद्यालयात हिंदी सप्ताह उत्साहात; विविध साहित्यिक स्पर्धांत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

0
35


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल येथे हिंदी विभागाच्या वतीने हिंदी सप्ताह उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. हिंदी दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेविषयी आवड निर्माण करण्यासोबतच त्यांच्या वाचन, लेखन, आकलन आणि सर्जनशील अभिव्यक्तीला चालना देण्यासाठी विविध साहित्यिक उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

हिंदी सप्ताहाच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एम. डी. खैरनार होते, तर प्रमुख वक्ते म्हणून उपप्राचार्य डॉ. एस. जी. भंगाळे उपस्थित होते. यावेळी डॉ. भंगाळे यांनी लघुकथा वाचन आणि काव्यवाचनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या सादरीकरण कौशल्याचे दर्शन घडविता येते, तर सारलेखन आणि पल्लव लेखनामुळे आकलनशक्ती, भाषिक कौशल्य तसेच सर्जनशीलतेला वाव मिळतो, असे मत व्यक्त केले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. एम. डी. खैरनार यांनी हिंदी सप्ताहासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेच्या वापराबाबत आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होते, असे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांची वाचनाची आवड, लेखनकौशल्य आणि साहित्यिक जाणिवा विकसित होण्यास अशा उपक्रमांचा उपयोग होतो. भविष्यात हिंदी भाषेच्या प्रचार-प्रसाराला चालना देण्यासाठी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

“हिंदी ही केवळ संवादाची भाषा नसून ती समृद्ध साहित्य, संस्कृती आणि विचारपरंपरेची भाषा आहे,” असे सांगत डॉ. खैरनार यांनी विद्यार्थ्यांना हिंदी सप्ताहापुरतेच हिंदी वाचन, लेखन आणि साहित्याशी नाते मर्यादित न ठेवण्याचे आवाहन केले. वर्षभर हिंदी साहित्याचे वाचन करावे तसेच लघुकथा, कविता, निबंध यांसारख्या साहित्यप्रकारांचा अभ्यास करून भाषिक आणि सर्जनशील अभिव्यक्ती विकसित करावी, असे त्यांनी नमूद केले.

हिंदी सप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध साहित्यिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. लघुकथा वाचन, कविता वाचन, काव्यवाचन, सारलेखन, पल्लव लेखन आणि निबंध लेखन अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांना आपल्या साहित्यिक आणि भाषिक कौशल्यांचे सादरीकरण करण्यासाठी या स्पर्धांमधून व्यासपीठ उपलब्ध झाले.

लघुकथा वाचन स्पर्धेत सविता जवानसिंग बारेला यांनी प्रथम, तर हर्षाली संतोष बारी यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. कविता वाचन स्पर्धेत रंगीता रेहंद्या बारेला प्रथम आणि मनीषा ताशा बारेला द्वितीय क्रमांकावर राहिल्या. काव्यवाचन स्पर्धेत मनीषा तेरसिंग बारेला यांनी प्रथम, तर रिता लालसिंग बारेला यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.

सारलेखन स्पर्धेत भारती काशीराम बारेला यांनी प्रथम, तर भूमिका प्रवीण शंकोपाळ यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. पल्लव लेखन स्पर्धेत शुभांगी अशोक साळवे यांनी प्रथम आणि कोमल दगडू इंगळे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. निबंध लेखन स्पर्धेत संगीता गुलसिंग सोळंकी यांनी प्रथम, तर अश्विन नाना पाटील यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. पी. व्ही. पावरा यांनी हिंदी सप्ताहाचे नियोजन केले. विविध उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पंकज बोदडे यांनी केले, तर प्रा. इमरान खान यांनी आभार मानले.


Protected Content

Play sound