Home आरोग्य जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम ; २७ सप्टेंबरला राज्यस्तरीय ‘गोदावरी करंडक’ भावगीत...

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम ; २७ सप्टेंबरला राज्यस्तरीय ‘गोदावरी करंडक’ भावगीत स्पर्धा

0
3


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धे’चे यंदाचे २९ वे वर्ष आहे. रविवार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून राज्यभरातील हौशी गायक-गायिकांना आपली गायनकला सादर करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेसाठी नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून जळगावात भावगीतांचा सुरेल संग्राम रंगणार आहे.

गोदावरी संगीत महाविद्यालयाने गेल्या अनेक वर्षांपासून ही स्पर्धा आयोजित करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विविध वयोगटांतील हौशी गायक-गायिकांना व्यासपीठ उपलब्ध झाले असून अनेक कलाकारांना आपल्या गायनकलेचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेकडे संगीतप्रेमी तसेच नवोदित गायक-गायिकांचे विशेष लक्ष लागले आहे. स्पर्धेचे आयोजन बाल गट, किशोर गट आणि प्रौढ गट अशा तीन वयोगटांत करण्यात आले आहे. बाल गटात इयत्ता पहिली ते सहावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. किशोर गटासाठी इयत्ता सातवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे, तर प्रौढ गटात ४० वर्षांपर्यंतचे स्पर्धक सहभागी होऊ शकतील. किशोर आणि प्रौढ गटातील स्पर्धकांना मराठी चित्रपटांतील भावगीते तसेच गझल सादर करता येणार आहेत. बाल गटासाठी बालगीते आणि भावगीते ग्राह्य धरली जाणार आहेत. प्रत्येक स्पर्धकाला केवळ एकच गीत सादर करता येणार असून एका गीतातील जास्तीत जास्त दोनच अंतरे सादर करण्याची परवानगी राहणार आहे.

स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रोख पारितोषिक, ‘गोदावरी करंडक’ आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रौढ गटातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास २ हजार १ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १ हजार ५०१ रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १ हजार १ रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. किशोर गटात प्रथम क्रमांकासाठी १ हजार ५०१ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १ हजार १ रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ७०१ रुपये, तर बाल गटात प्रथम क्रमांकासाठी १ हजार १ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७०१ रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ५०१ रुपये अशी पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. याशिवाय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. त्यामुळे विविध वयोगटांतील हौशी कलाकारांना आपल्या गायनकौशल्याचे प्रदर्शन करण्याबरोबरच प्रोत्साहन मिळणार आहे.

राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा रविवार, २७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता सुरू होणार असून त्याच दिवशी सायंकाळी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. स्पर्धेचे स्वरूप हौशी कलाकारांसाठी ठेवण्यात आले आहे. व्यावसायिक तसेच आकाशवाणी मान्यताप्राप्त कलाकारांना या स्पर्धेत प्रवेश दिला जाणार नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कलाकारांनी प्रवेश अर्जाची झेरॉक्स प्रत सादर करणे आवश्यक आहे. इच्छुक स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी गोदावरी संगीत महाविद्यालय, गोदावरी हॉस्पिटल, भास्कर मार्केटजवळ, जळगाव येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी ९८५०० ७५६५१ आणि ९९२१९९ ६९७४ या क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे.


Protected Content

Play sound