Home धर्म-समाज यावल शहरासह पाच गावांत पाचव्या दिवसाच्या गणरायाला उत्साहात निरोप 

यावल शहरासह पाच गावांत पाचव्या दिवसाच्या गणरायाला उत्साहात निरोप 

0
20


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी यावल शहरासह तालुक्यातील नायगाव, कोरपावली, डांभुर्णी, दहिगाव आणि सावखेडा सिम या पाच गावांत श्री गणरायाचे उत्साहपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. शहरात विविध गणेश मंडळांच्या वतीने वाद्यवृंदाच्या गजरात भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. विशेष म्हणजे, शहर व ग्रामीण भागातील सर्व विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या. यावल पोलिसांच्या वतीने तगडा बंदोबस्त ठेवण्यात आल्याने उत्सवाला शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण स्वरूप लाभले.

यावल शहरातील तब्बल २१ गणेश मंडळांच्या वतीने शुक्रवारी पाच दिवसांच्या गणरायाला मोठ्या जल्लोषात निरोप देण्यात आला. ढोल-ताशे, विविध वाद्यवृंद आणि गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषाने शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. शहरातील मुख्य मार्गावरून गणेश विसर्जनाच्या भव्य मिरवणुका काढण्यात आल्या.

निर्धारित रात्री १२ वाजेच्या वेळेत शहरातील सर्व गणेश मंडळांच्या मिरवणुका नगरपालिकेजवळील रेणुका माता मंदिर परिसरात पोहोचल्या. त्यानंतर भुसावळ रस्त्यावरील हतनूर कालवा तसेच तापी नदीपात्रात गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. यावेळी गणेशभक्तांनी भावपूर्ण वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप दिला. विसर्जन मिरवणुका सुरळीत आणि शांततेत पार पडाव्यात यासाठी यावल शहरात पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अपर पोलिस अधीक्षक संदीप गावीत, फैजपूर विभागाचे डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोलिस उपनिरीक्षक मैनोद्दीन सैय्यद, अनिल महाजन, एम.जे. शेख, सहायक फौजदार विजय पाचपोळे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळली.

पोलिसांसोबतच हवालदार, गृहरक्षक दलाचे कर्मचारी आणि इतर सुरक्षा यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष देण्यात आले होते. त्यामुळे गणेश मंडळांच्या मिरवणुका कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडल्या. यावल शहरातील काझी मस्जिद परिसरात शांतता समितीच्या सर्वधर्मीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. या उपक्रमातून शहरातील सामाजिक सलोखा आणि सर्वधर्मीय ऐक्याचे दर्शन घडले. मिरवणुकीत सहभागी गणेशभक्तांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान, शहराप्रमाणेच यावल तालुक्यातील ग्रामीण भागातही पाचव्या दिवसाच्या गणरायाला उत्साहात निरोप देण्यात आला. नायगाव, कोरपावली, डांभुर्णी, दहिगाव आणि सावखेडा सिम या पाच गावांमध्ये गणेशभक्तांनी मिरवणुका काढत पारंपरिक पद्धतीने गणेशमूर्तींचे विसर्जन केले. गावागावांत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.


Protected Content

Play sound