Home Cities रावेर रोझोदा जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शारीरिक शिक्षणाचे गणवेश 

रोझोदा जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शारीरिक शिक्षणाचे गणवेश 

0
12


सावदा, ता. रावेर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रोझोदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणासाठी मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले. मुंबईतील बोरीवली येथील हरचंद लोखंडे माध्यमिक विद्यालयात गेल्या २७ वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत असलेले रोझोदा येथील रहिवासी, लेखक, कवी व पत्रकार राजेंद्र तुळशीराम चौधरी आणि त्यांच्या पत्नी स्वाधिनता राजेंद्र चौधरी यांनी हा सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविला. शनिवारी, १९ सप्टेंबर रोजी झालेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली गणवेश वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी वैकुंठवासी डिगंबर महाराज मठ, पंढरपूरचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे (फैजपूर), रोझोदा लोकशिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष रमेश महाजन, श्रीराम मंदिर व कामसिद्ध मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन तसेच लोकनियुक्त सरपंच पुष्कर फेगडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि आयोजकांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणाचे गणवेश वितरित करण्यात आले. गणवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक आणि सर्वांगीण विकासासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यावेळी रविंद्र चौधरी आणि राजेंद्र चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच शारीरिक शिक्षण, क्रीडा आणि इतर उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मिलिंद वायकोळे यांनी केले. प्रमुख पाहुणे नरेंद्र नारखेडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचे महत्त्व विशद करत चौधरी दाम्पत्याने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी प्रगती विद्यालयाच्या नवनियुक्त मुख्याध्यापिका बोरोल यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रगती विद्यालयाच्या शिक्षिका दोडके यांनी केले, तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका पालकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमास सुधाकर महाजन, नारायण राणे, ललित धांडे, मिलिंद वायकोळे, रविंद्र चौधरी, चेतन भारंबे, जिल्हा परिषद शाळेचे गटशिक्षणाधिकारी, रविंद्र धांडे, सुनील राणे, पिंटू भारंबे, टेनूदास फेगडे, लक्ष्मण धांडे, दीपक धांडे, भूषण चौधरी, अमर चौधरी, बंडू नेहेते, शंकर पाटील, प्रेम चौधरी, संजय चौधरी, संजय राणे, वासुदेव चौधरी, हर्षल सरोदे, अंगणवाडी सेविका, पत्रकार प्रविण पाटील, पंकज पाटील, राजेश चौधरी, देवेंद्र चौधरी, रविंद्र महाजन यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound