Home धर्म-समाज मुक्ताईनगरात श्री सर्वसमाज विशाल गणेश मंडळातर्फे विविध स्पर्धा व मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन

मुक्ताईनगरात श्री सर्वसमाज विशाल गणेश मंडळातर्फे विविध स्पर्धा व मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन

0
78

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गणेशोत्सवानिमित्त मुक्ताईनगर शहरातील श्री सर्वसमाज विशाल गणेश मंडळाच्या वतीने नागरिकांसाठी विविध मनोरंजक कार्यक्रम, आकर्षक स्पर्धा आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २१ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम पार पडणार असून, गणेशोत्सवाच्या आनंदात नागरिकांना कला, मनोरंजन आणि स्पर्धेचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे.

दि. २१ सप्टेंबर रोजी  प्रमोद भारंबे यांच्या उपस्थितीत भव्य कॉमेडी व मॅजिक शो आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातून नागरिकांना हास्यविनोदासोबतच जादूचे मनोरंजक प्रयोग अनुभवता येणार आहेत. दि. २२ सप्टेंबर रोजी मधुकर अँकवा यांच्या उपस्थितीत भव्य होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांसाठी आयोजित या स्पर्धेत विविध मनोरंजक खेळ आणि उपक्रमांचा समावेश असणार आहे. त्यानंतर दि. २३ सप्टेंबर रोजी एस.एस. मोबाईल, महावीर इलेक्ट्रिकल आणि महावीर हार्डवेअर यांच्या सहकार्याने पुन्हा भव्य होम मिनिस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

दि. २४ सप्टेंबर रोजी डॉ. जगदीश पाटील व नितीन जैन (बंटीभाऊ) यांच्या उपस्थितीत भव्य डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कलाकारांना आपले नृत्यकौशल्य सादर करण्याची संधी मिळणार असून, कार्यक्रमाला नागरिकांची मोठी उपस्थिती राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. दि. २५ सप्टेंबर रोजी अभी पेंट गॅलरी अँड इंटरप्रायझेस व ड्रीम लँड डेव्हलपर्स यांच्या सहकार्याने भव्य गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून गायनाची आवड असलेल्या नागरिकांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.

या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनासाठी स्वप्नपूर्ती इंग्लिश क्लासेस यांचेही अनमोल सहकार्य लाभत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सलग पाच दिवस विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने नागरिकांसाठी उत्सवाचे वातावरण अधिक आनंददायी होणार आहे. विशेष म्हणजे, दिव्यांग बांधवांसह सर्व समाजघटकांना मनोरंजन, कला आणि विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विविध कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री सर्वसमाज विशाल गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound