


नशिराबाद- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुरू झालेल्या ‘सेवा पंधरवाड्या’च्या पहिल्याच दिवशी नशिराबाद नगरपरिषदेच्या वतीने संपूर्ण शहरात प्लास्टिकबंदीची ऐतिहासिक घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयाची केवळ कागदावर अंमलबजावणी न राहता ती प्रत्यक्षात उतरावी यासाठी प्रभारी नगराध्यक्ष पंकज महाजन हे नगरसेवक, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह स्वतः रस्त्यावर उतरले. त्यांनी दुकानदारांशी आणि नागरिकांशी थेट संवाद साधत प्लास्टिकमुक्त नशिराबादसाठी विशेष जनजागृती मोहीम राबवली.
या जनजागृती मोहिमेअंतर्गत नगरपरिषदेच्या वतीने शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान प्रभारी नगराध्यक्ष पंकज महाजन यांनी विविध व्यापारी, दुकानदार आणि व्यावसायिक बांधवांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्लास्टिकबंदीच्या निर्णयाची माहिती दिली. दैनंदिन व्यवहारात प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पूर्णपणे टाळण्याचे आवाहन करत त्यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी सर्वांनी पुढे येण्याची विनंती केली. या उपक्रमाला स्थानिक व्यापाऱ्यांकडून अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, “आम्ही स्वतः प्लास्टिकच्या वापराच्या विरोधात आहोत आणि या मोहिमेत नगरपालिकेसोबत आहोत,” अशी ग्वाही दुकानदारांनी दिली.
प्लास्टिकबंदीच्या आवाहनासोबतच प्रभारी नगराध्यक्ष पंकज महाजन यांनी नशिराबादमध्ये ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेचाही विशेष प्रचार केला. गावातील व्यापारी, छोटे व्यावसायिक आणि स्थानिक उत्पादकांना आर्थिक बळ मिळावे, गावात तयार होणाऱ्या वस्तूंना गावातच मोठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी सर्व नागरिकांनी आपल्या दैनंदिन खरेदीसाठी स्थानिक दुकानदारांनाच प्राधान्य द्यावे, असा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी दिला. स्थानिक व्यवसाय वाढल्यास गावाचा आर्थिक विकास गतिमान होईल आणि नशिराबादची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल, असा विश्वास रॅलीच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला.
या धडक जनजागृती रॅलीत नगरसेविका शैला व्यवहारे, नगरसेवक सय्यद वासिफ, नगरसेवक आसिफ शेख मनियार, नगरसेवक इकबाल शेख यांच्यासह नगरपरिषदेचे अनेक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीच्या संपूर्ण मार्गावर घोषणाबाजी करत नागरिकांना प्लास्टिकमुक्त शहर आणि स्थानिक व्यवसायाला प्रोत्साहन देण्याचे कळकळीचे आवाहन करण्यात आले.



