


रावेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आगामी गणेश विसर्जन मिरवणुक शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी रावेर पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. रावेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तब्बल ३०८ उपद्रवी आणि संशयित घटकांना पाच दिवसांच्या कालावधीसाठी तालुका हद्दपार करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस अधीक्षकांकडे पाठवण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी हा विशेष प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.
रावेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवाच्या काळात विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये, कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये यासाठी प्रशासनाकडून पूर्वतयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विविध कायदेशीर कलमांन्वये ३०८ जणांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवला गेला आहे. या प्रस्तावानुसार दि. २२ पासून हद्दपारीचा आदेश लागू होणार असून, दि. २७ पर्यंत म्हणजे सलग पाच दिवस या सर्व उपद्रवी व्यक्तींना रावेर तालुक्याच्या सीमेत प्रवेश करण्यास सक्त मनाई असणार आहे.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या या कडक इशाऱ्यामुळे तालुक्यातील असामाजिक तत्त्वांचे धाबे दणाणले आहेत. विसर्जन मिरवणुकीत शांतता भंग करणाऱ्यांवर तसेच कोणत्याही प्रकारचा गोंधळ घालणाऱ्यांवर पोलीस बारीक लक्ष ठेवून राहणार आहेत. सर्व नागरिकांनी आणि गणेश भक्तांनी उत्सव शांततेत आणि शिस्तीत साजरा करावा, तसेच पोलिसांच्या या उपक्रमाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन रावेर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.



