Home Cities मुक्ताईनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत द्या ; आमदार एकनाथराव खडसे...

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत द्या ; आमदार एकनाथराव खडसे यांची शासनाकडे आक्रमक मागणी

0
14


मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात यंदा पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे मका, कापूस, सोयाबीन, मूग, उडीद यासह सर्वच खरीप पिके पूर्णपणे करपून नष्ट झाली आहेत. शेतात पिके शिल्लक राहिलेली नसून हाताला पैसा नाही आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे, अशा अत्यंत बिकट परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजूर पूर्णपणे मोडून पडला आहे. या गंभीर परिस्थितीची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन जिल्ह्यात ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करावा आणि पीडित शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची सरसकट व थेट आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी विधान परिषद सदस्य तथा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

आमदार एकनाथराव खडसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, पावसाच्या दीर्घखंडामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी अभूतपूर्व संकटात सापडला आहे. या बिकट परिस्थितीतून बळीराजाला बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने कागदी औपचारिकता आणि पंचनाम्यांच्या नावाखाली वेळ न घालवता तातडीने ठोस पावले उचलणे अत्यंत गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या सर्व प्रकारच्या पीक व शेती कर्जाची वसुली तात्काळ थांबवण्यात यावी आणि ७/१२ उतारा पूर्णपणे कोरडा करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे. तसेच फळबागदारांचे झालेले नुकसान विचारात घेता त्यांना मल्चिंग पेपरसह आवश्यक ते अनुदान उपलब्ध करून द्यावे आणि मागणीनुसार १०० टक्के अनुदानावर शेततळी मंजूर करण्यात यावीत, असेही त्यांनी नमूद केले आहे.

या निवेदनात दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी १० महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत. यामध्ये ‘१ रुपयात पीक विमा’ योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करून त्यातील जाचक अटी व शर्ती शिथिल कराव्यात तसेच ई-पीक पाहणी व पीक नोंदणीतील सर्व तांत्रिक त्रुटी तात्काळ दूर कराव्यात, अशी मागणी समाविष्ट आहे. तसेच दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांची (विशेषतः आरोग्य, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व उच्च शिक्षण घेणाऱ्या) संपूर्ण शाळा व महाविद्यालयीन फी पूर्णपणे माफ करण्यात यावी. याशिवाय जिल्ह्यातील प्रत्येक गावात हाताला काम मिळण्यासाठी जलसंधारण, शेतरस्ते व इतर कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (नरेगा) तात्काळ सुरू करावीत, ग्रामीण व नागरी भागात पिण्याच्या पाण्याचा मुबलक पुरवठा करावा आणि पशुधनासाठी चारा, पाणी व लसीकरण मोहीम तात्काळ राबवावी, असेही खडसे यांनी सुचवले आहे.

इतकेच नव्हे तर दिव्यांग, निराधार, वृद्ध, लाडकी बहीण व इतर सर्व शासकीय योजनांचे मानधन लाभार्थ्यांना नियमित व वेळेत वितरीत करण्यात यावे आणि सर्वसामान्य व दुर्बल घटकांना देण्यात आलेल्या रेशनकार्डबाबतच्या ई-केवायसी किंवा ई-डोस नोटिसा तात्काळ रद्द करून त्यांचा नियमित धान्य पुरवठा सुरू ठेवावा, अशा महत्त्वपूर्ण मागण्याही करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा विलंब न करता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष व तातडीचा दिलासा देण्याकरिता वरील सर्व मागण्यांवर त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन आमदार एकनाथराव खडसे यांनी केले आहे.


Protected Content

Play sound