Home Cities जळगाव जिल्ह्यात आजपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा धडाका 

जिल्ह्यात आजपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा धडाका 

0
6


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्वच्छ व विकसित भारताच्या उभारणीसाठी जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान अत्यंत उत्साहात राबविण्यात येणार आहे. स्वच्छतेचे ध्येय साध्य करण्यासाठी केवळ प्रशासकीय यंत्रणा पुरेशी नसून ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी हे अभियान एका व्यापक लोकचळवळीच्या स्वरूपात राबवून गावे स्वच्छ व सुंदर बनवावीत, असे कळकळीचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी केले आहे.

‘स्वच्छतेमध्ये सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत’ या मुख्य संकल्पनेवर आधारित या अभियानात विविध नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. पंधरा दिवसांच्या या कालावधीत गावांमधील अस्वच्छ व दुर्गम ठिकाणांचे विशेष सर्वेक्षण करून त्यांची स्वच्छता केली जाईल. याशिवाय घनकचरा व्यवस्थापन केंद्रांना भेटी, शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘स्वच्छता ज्ञानयात्रा’, सफाईमित्रांसाठी आरोग्य तपासणी व सन्मान शिबिरे, मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, कचरा वर्गीकरणाची घरोघरी जनजागृती तसेच ‘वेस्ट टू वेल्थ’ आणि ‘वेस्ट टू आर्ट’ यांसारख्या संकल्पना प्रत्यक्ष राबविल्या जातील.

अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांना विशेष निर्देश देण्यात आले आहेत. सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व उपसरपंच यांनी आपापल्या क्षेत्रात नियोजनबद्ध कृती आराखडा तयार करून या मोहिमेचे नेतृत्व करावे. स्वच्छाग्रही आणि स्वच्छता दूतांनी घरोघरी जाऊन कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवून द्यावे. तसेच शिक्षक, विद्यार्थी, महिला बचत गट, युवक मंडळे, सामाजिक कार्यकर्ते यांनी श्रमदानातून स्वच्छता मोहिमेत पुढाकार घ्यावा. धार्मिक व आध्यात्मिक नेत्यांनीही प्रवचन आणि सत्संगाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश समाजात प्रसृत करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

“स्वच्छता ही केवळ शासनाची जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाची नैतिक सेवा आहे; गावातील प्रत्येक हात जोडला गेल्यासच खऱ्या अर्थाने विकसित भारताचे स्वप्न साकार होईल,” असे स्पष्ट करत मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी सर्व पंचायत समित्यांना मोहिमेचे दैनंदिन अहवाल व छायाचित्रे पोर्टलवर अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक राहुल जाधव यांनीही जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना हे अभियान यशस्वी करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.


Protected Content

Play sound