Home Cities जळगाव पर्यावरणपूरक संदेश अन् सामाजिक जनजागृतीची जोड ; जळगाव मनपाच्या मानाच्या गणपतीचा अनोखा...

पर्यावरणपूरक संदेश अन् सामाजिक जनजागृतीची जोड ; जळगाव मनपाच्या मानाच्या गणपतीचा अनोखा उत्सव

0
13


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर महानगरपालिकेच्या यंदाच्या मानाच्या श्री गणेशोत्सवाला परंपरेसोबतच पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जनजागृतीची जोड देण्यात आली आहे. महापौर दीपमाला काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘इको फ्रेंडली’ संकल्पनेतून साजरा होत असलेला हा गणेशोत्सव नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभाग या तीन बाबींचा समन्वय साधत महापालिकेने उत्सवाला सामाजिक संदेशाचे स्वरूप दिले आहे.

यंदाच्या मानाच्या श्री गणेशाची मूर्ती केळीच्या लगद्यापासून साकारण्यात आली आहे. तसेच मूर्तीला रासायनिक रंगांचा वापर न करता नैसर्गिक गेरूने रंगविण्यात आले आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सकाळच्या सत्रात महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते, तर संध्याकाळी प्रभागनिहाय रोटेशन पद्धतीने नगरसेवकांच्या हस्ते महाआरतीचे आयोजन केले जात आहे.

गणेशोत्सव परिसरात प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यासाठी कापडी पिशव्यांच्या वापरावर भर देण्यात आला आहे. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या संकल्पनेतून वृक्षारोपणाचा संदेशही देण्यात येत आहे. यासोबतच महानगरपालिकेच्या विविध कल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी डिजिटल फलक आणि एलईडी स्क्रीनचा वापर केला जात आहे. या स्क्रीनवर विविध विषयांवरील माहितीपट आणि शॉर्ट फिल्म्स दाखविण्यात येत आहेत. उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर जनजागृती करण्यासाठी दररोज विविध पथनाट्यांचे आयोजन केले जात आहे. याशिवाय भारुडाच्या माध्यमातूनही सामाजिक संदेश देण्यात येत आहेत. महानगरपालिकेच्या विविध विषयांवर आधारित माहितीपट नागरिकांना दाखविण्यात येत असून, उत्सवाला केवळ धार्मिक स्वरूप न ठेवता सामाजिक प्रबोधनाची जोड देण्यात आली आहे.

नागरिक आणि तरुणाईचा सहभाग वाढविण्यासाठी विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धांमध्ये विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जात आहेत. तसेच मोठ्या खेळांमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींमधील विजेत्यांना साडी बक्षीस म्हणून देण्यात येत आहे. उत्सवाच्या ठिकाणी तरुणाईसाठी विशेष ‘सेल्फी पॉईंट’ उभारण्यात आला असून, त्यामुळे गणेशोत्सवातील सहभागाला एक वेगळा आयाम मिळाला आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पहिल्या तीन दिवसांत आतापर्यंत सुमारे १५ हजार नागरिकांनी मानाच्या श्री गणेशाचे दर्शन घेतले आहे. नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, धार्मिक उत्सवासोबतच पर्यावरण आणि सामाजिक जनजागृतीचा संदेश पोहोचविण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याचे चित्र आहे. शनिवार, १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेआठ वाजता गणेशोत्सव परिसरात विशेष ‘भजन संध्या’ आयोजित करण्यात आली आहे. अनामिका मेहरा यांच्या सुश्राव्य वाणीतून भक्तिगीतांचे सादरीकरण होणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांसाठी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचीही मेजवानी उपलब्ध होणार आहे.


Protected Content

Play sound