


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर अधिक हिरवेगार आणि सुशोभित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘हरित जळगाव’ उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आकाशवाणी सर्कल येथे काही महिन्यांपूर्वी लावण्यात आलेल्या १०० बोगनवेलींची नियमित देखभाल आणि पाणीपुरवठ्यामुळे त्या आता बहरल्या असून परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे. याच उपक्रमाचा पुढील टप्पा म्हणून आकाशवाणी चौकातील दुभाजकावर २५ पारिजात वृक्षांची लागवड करण्यात आली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त १४ जून २०२६ रोजी आकाशवाणी सर्कल येथे १०० बोगनवेलींची लागवड करण्यात आली होती. लागवडीनंतर केवळ झाडे लावून न थांबता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे नियमित संगोपन केले. वेळोवेळी पाणी देणे आणि आवश्यक देखभाल केल्यामुळे या सर्व बोगनवेलींची वाढ होऊन त्या सध्या साधारण दोन ते दोन फूट उंच झाल्या असून बहरल्या आहेत. त्यामुळे आकाशवाणी सर्कलच्या परिसराच्या रूपातही बदल झाल्याचे दिसून येत आहे. या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात आकाशवाणी चौक येथे २५ दुर्मिळ फापडा अर्थात पारिजात वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षांना फुले येत असल्याने भविष्यात परिसर अधिक हिरवागार आणि सुगंधी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे यापैकी एका पारिजात वृक्षाची लागवड सुमारे तीन वर्षांपूर्वी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी एका खापराच्या कुंडीत केली होती. या रोपट्याचे सातत्याने संगोपन करून त्याची वाढ करण्यात आली. कालांतराने या रोपट्याचे मोठ्या वृक्षात रूपांतर झाल्यानंतर त्याचे आकाशवाणी चौकातील दुभाजकावर पुनर्रोपण करण्यात आले. झाडांच्या संगोपनातून शहरातील सार्वजनिक जागांवर हरित क्षेत्र वाढविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे. या दोन्ही उपक्रमांसाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उप-महानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, उप-महानगराध्यक्ष ललित शर्मा आणि शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. लागवडीनंतर झाडांची देखभाल आणि संगोपन करण्यावरही पदाधिकाऱ्यांकडून भर दिला जात आहे.
आकाशवाणी चौक परिसरातून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा होत असल्याने येथे करण्यात आलेल्या वृक्षलागवडीमुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडण्यास मदत होणार आहे. बोगनवेली बहरल्याने आकाशवाणी सर्कलचा परिसर अधिक आकर्षक दिसू लागला असून, नव्याने लावण्यात आलेल्या पारिजात वृक्षांमुळे भविष्यात या परिसरात हिरवाई आणि फुलांचा सुगंध वाढण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. जळगाव शहरातील विविध भागांमध्ये अशा प्रकारे वृक्षलागवड करून त्यांचे सातत्याने संगोपन करण्याची गरज असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. केवळ वृक्षलागवड न करता त्यांची नियमित देखभाल केल्यास शहरातील सार्वजनिक ठिकाणे अधिक हिरवीगार आणि आकर्षक होऊ शकतात, असा संदेश या उपक्रमातून पुढे येत आहे.



