Home क्राईम नशिराबादजवळ रिक्षा गॅरेजवर आदळली : अपघातात चार ते पाच जण जखमी

नशिराबादजवळ रिक्षा गॅरेजवर आदळली : अपघातात चार ते पाच जण जखमी

0
19


नशिराबाद- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद परिसरातील नॅशनल पत्रा दुकानाजवळ गुरुवारी एक भीषण रस्ता अपघात घडला. भुसावळच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या एका ऑटो रिक्षावरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने रिक्षा थेट रस्त्यालगत असलेल्या गॅरेजवर जाऊन जोरदार आदळली. या दुर्दैवी अपघातात चार ते पाच प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी एका वयोवृद्ध महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर आणि चिंताजनक असल्याचे समजते.

अपघातातील मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, रिक्षाचालक योगेश रमेश कोळी (वय ३४, रा. राजोरा, ता. यावल, जि. जळगाव) हा आपल्या ताब्यातील रिक्षा घेऊन भुसावळच्या दिशेने जात होता. नॅशनल पत्रा दुकानाजवळ पोहोचताच अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि अनियंत्रित झालेली रिक्षा महामार्गालगत असलेल्या एका गॅरेजमध्ये थेट जाऊन घुसली. अपघात इतका तीव्र होता की रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. नागरिकांनी रिक्षात अडकलेल्या जखमींना बाहेर काढून मदत केली. या घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे जीपीएसआय संजय सूर्यवंशी आणि पोलीस कर्मचारी रुपेश साळवे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी गोदावरी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. सध्या सर्व जखमींवर गोदावरी रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू असून नशिराबाद पोलीस या अपघाताप्रकरणी पुढील कायदेशीर तपास आणि कार्यवाही करत आहेत.


Protected Content

Play sound