Home Cities मुक्ताईनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या ; आ. चंद्रकांत पाटलांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या ; आ. चंद्रकांत पाटलांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

0
6


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मागील सुमारे एक ते दीड महिन्यापासून पावसाने मोठ्या प्रमाणात दडी मारल्याने जळगाव जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. मुक्ताईनगर-बोदवड तालुक्यांसह संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा करत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, नुकसानभरपाई, पीकविमा लाभ आणि दुष्काळी सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील बहुतांश शेती ही पावसावर अवलंबून आहे. यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला पेरण्या झाल्यानंतर पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या कालावधीत पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. अनेक भागांत पिकांची वाढ खुंटली असून काही ठिकाणी पिके करपण्याच्या स्थितीत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पेरणीपूर्व मशागत, बियाणे, खते, कीटकनाशके, औषधे तसेच अन्य शेतीकामांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. मात्र, पावसाअभावी पिकांची अपेक्षित वाढ न झाल्याने शेतकऱ्यांची केलेली गुंतवणूक धोक्यात आली आहे. उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत असल्याचे आमदार पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.

मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यांसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील सद्यस्थितीचा शासनाने तातडीने आढावा घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. पिकांची प्रत्यक्ष परिस्थिती, पावसाचे प्रमाण आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान यांचा विचार करून जिल्हा दुष्काळग्रस्त किंवा दुष्काळसदृश परिस्थितीग्रस्त म्हणून घोषित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निवेदनात नमूद आहे. यासाठी महसूल आणि कृषी विभागाच्या माध्यमातून तातडीने पीक परिस्थितीचे सर्वेक्षण करण्यात यावे, तसेच प्रत्यक्ष नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. सर्वेक्षण आणि पंचनाम्याच्या आधारे पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

याशिवाय पात्र शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा लाभ मिळावा, दुष्काळी सवलती लागू करण्यात याव्यात आणि आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचा केवळ पिकांवरच नव्हे, तर शेतकरी कुटुंबे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता असल्याने शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे. विशेष बाब म्हणून या परिस्थितीचा विचार करून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा आणि अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आता शासनाकडून पीक परिस्थितीचा आढावा, सर्वेक्षण आणि संभाव्य मदतीबाबत कोणती कार्यवाही केली जाते, याकडे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound