


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीचे औचित्य साधून १५ सप्टेंबर रोजी गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘अभियंता दिन’ मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे दिमाखदार उद्घाटन करण्यात आले.
या सोहळ्याला महावितरणचे उपकार्यकारी अभियंता धम्मपाल एच. पंडित, पवन शिंपी आणि अमोल पारेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी सांगितले की, आजच्या वेगाने बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून, अभियंत्यांनी तांत्रिक ज्ञानासोबतच सर्जनशील विचार, दृढ आत्मविश्वास आणि कठीण समस्या सहजपणे सोडविण्याची क्षमता विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे.
अभियंता दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स (E&TC) विभागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष ज्ञानवर्धक आणि रंजक क्विझ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्तपणे भाग घेतला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. एच. टी. इंगळे, प्रा. डॉ. आय. एस. जाधव, प्रा. डॉ. व्ही. डी. चौधरी, प्रा. डॉ. देवेंद्र मराठे, प्रा. एम. एन. पाटील आणि प्रा. हेमराज धांडे उपस्थित होते. क्विझ स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. तुषार कोळी, डॉ. नितीन भोळे, डॉ. हेमंत इंगळे, प्रा. निलेश वाणी, प्रा. महेश एच. पाटील आणि डॉ. अनिलकुमार विश्वकर्मा यांनी विशेष परिश्रम घेतले. या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी महाविद्यालयाचे कौतुक केले.



