Home आरोग्य बोदवड ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा ; तक्रारदार नागरिकांना गुन्हे दाखल...

बोदवड ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा ; तक्रारदार नागरिकांना गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या?

0
14


बोदवड- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बोदवड येथील ग्रामीण रुग्णालयातील अस्वच्छता आणि आरोग्य सेवेच्या अनागोंदी कारभाराबाबत सोशल मीडियावर माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. प्रसूती विभागातील साहित्याची स्वच्छता आणि मूलभूत सोयी-सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून या निष्काळजीपणाबाबत प्रशासनाला जाब विचारणाऱ्या नागरिकांना थेट गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

आरोग्यसेवेच्या नावाखाली चाललेला हा बेजबाबदार कारभार रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या जीवाशी खेळणारा ठरू शकतो. प्रसूतीसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याच्या निर्जंतुकीकरणावर आणि रुग्णालयातील स्वच्छतेवरच नागरिक प्रश्न उपस्थित करत असतील, तर हा विषय अत्यंत संवेदनशील मानला पाहिजे. उपचारासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकाची केवळ सुरक्षित आणि स्वच्छ सेवेची अपेक्षा असते. परंतु, तक्रार घेऊन जाणाऱ्या नागरिकांना सहकार्य करण्याऐवजी किंवा समाधानकारक उत्तर देण्याऐवजी “शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करू” अशा प्रकारच्या धमक्या अधिकाऱ्यांकडून दिल्या जात असल्याचे समोर येत असल्याने प्रशासनाच्या उत्तरदायित्वावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सरकारी रुग्णालये ही जनतेच्या करांमधून चालतात, त्यामुळे तेथील सोयी-सुविधा, औषधोपचार आणि वैद्यकीय साहित्याबाबत प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार नागरिकांना आहे. जर सोशल मीडियावर समोर आलेली माहिती चुकीची असेल, तर प्रशासनाने धमक्या देण्याऐवजी अधिकृत स्पष्टीकरण आणि पुराव्यांसह वस्तुस्थिती जनतेसमोर मांडायला हवी. प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांचा आवाज दाबणे ही लोकशाहीत अत्यंत घातक मानसिकता असून आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोदवड ग्रामीण रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रसूती विभागातील स्वच्छता व निर्जंतुकीकरणाच्या प्रक्रियेची तातडीने निष्पक्ष चौकशी करणे गरजेचे आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित हस्तक्षेप करून रुग्णालयातील सर्व सेवांची व तक्रारींची चौकशी करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांवर मुजोरी दाखवणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर वचक बसवून प्रशासनाने आपले उत्तरदायित्व सिद्ध करणे काळाची गरज बनली आहे.


Protected Content

Play sound