Home पर्यावरण रावेर तहसीलसमोर केळी उत्पादक शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन ; पीकविमा कंपनीने घेतली दखल,...

रावेर तहसीलसमोर केळी उत्पादक शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन ; पीकविमा कंपनीने घेतली दखल, पुण्यातील बैठकीकडे लक्ष

0
10


रावेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वादळामुळे झालेल्या अतोनात नुकसानाची भरपाई आणि केळी पीकविम्याच्या प्रलंबित रकमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा कराव्यात, या मागणीसाठी रावेर तहसील कार्यालयासमोर केळी उत्पादक शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन छेडले. सुनिल कोंडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले असून तालुकाभरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

गेल्या १ जून, ४ जून आणि ६ जून रोजी आलेल्या तीव्र चक्रीवादळामुळे रावेर तालुक्यातील केळीच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले होते. प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करण्यात आले, मात्र तीन महिने उलटूनही अद्याप मदतीबाबत कुठलाही शासन निर्णय झालेला नाही. त्यातच पीकविम्याचे मंजूर महसूल मंडळ अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही आणि तब्बल १४ हजार शेतकऱ्यांच्या विमा मंजूर क्षेत्रात त्रुटी दाखवून कमी क्षेत्र नोंदवले गेले आहे. विमा कंपनीकडून या दुरुस्तीबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. याच तीव्र रोषातून शेतकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे धरणे आंदोलन आयोजित केले होते.

आंदोलनाची तीव्रता पाहून तहसीलदार संजय तायडे, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके तसेच पीकविमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी वैभव पाटील, मनोहर पाटील व भगवान पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. अधिकाऱ्यांनी पीकविमा कंपनीचे नाशिक विभागीय प्रमुख सोमेश देशमुख यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा घडवून आणली. येत्या १५ तारखेला पुणे येथील कृषी आयुक्तालयात यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, आंदोलकांचे निवेदन व मागण्या कंपनी वरिष्ठांकडे पाठवून आठवड्याभरात योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन सोमेश देशमुख यांनी दिले. या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन मागे घेतले असले, तरी येत्या आठवड्याभरात सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. विशेष म्हणजे, प्रशासनाला मागण्यांचा विसर पडू नये म्हणून अजंदा येथील शेतकरी सुरेश पाटील यांनी आणलेली केळी आंदोलनकर्त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना भेट दिली.

या धरणे आंदोलनाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धनंजय चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख योगीराज पाटील, डॉ. संदीप पाटील, सी. एस. पाटील, मधुकर पाटील, सुरेश चिंधू पाटील, वाय. एस. महाजन, डॉ. राजेंद्र पाटील, किशोर पाटील, डॉ. सुरेश पाटील, सोपान पाटील, गणेश महाजन, राजेंद्र चौधरी, उमाकांत महाजन, डिगंबर चौधरी, गुणवंत भंगाळे, सुधीर मोरे, विवेक बोंडे, गिरीश नेहेते, योगेश कोळंबे, विष्णू भिरुड, सतीश पाटील, समाधान सावळे, दीपक महाजन, गोपाळ भिरुड, राकेश बऱ्हाटे, कन्हैया भारंबे, शेख नाजीम, रफिक शेठ, प्रफुल्ल बोंडे, किरण गाजरे, संजय गाजरे, राहुल टोके, भूषण महाजन, स्वप्नील गारसे, विनोद पाटील, प्रशांत बोरोले, ललित पाटील, ललित भंगाळे, ॲड. जे. जी. पाटील, राजेंद्र धनगर, पंकज पाटील, प्रकाश पाटील, राकेश घोरपडे, मोहन बोंडे आणि राजेंद्र पाटील यांच्यासह शेकडो केळी उत्पादकांनी पाठिंबा दर्शवला.


Protected Content

Play sound