Home Cities पाचोरा सारोळा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराची चौकशी होणार ; आमदार किशोर पाटलांच्या मध्यस्थीनंतर...

सारोळा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराची चौकशी होणार ; आमदार किशोर पाटलांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे

0
13


पाचोरा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सारोळा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या कारभारात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर पुकारलेले आमरण उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. आमदार किशोर पाटील आणि गटविकास अधिकारी के. बी. अंजने यांनी उपोषणस्थळी भेट देऊन येत्या १८ सप्टेंबरपासून सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.

पाचोरा तालुक्यातील सारोळा बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या विविध कामकाजात, विकासकामांमध्ये, मिळालेल्या निधीच्या वापरात तसेच प्रशासकीय निर्णयांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी यापूर्वी प्रशासनाकडे अनेक निवेदने व तक्रारी दिल्या होत्या. मात्र, प्रशासनाकडून अपेक्षित स्वरूपात सखोल आणि निष्पक्ष चौकशी न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला होता.

उपोषणाची माहिती मिळताच आमदार किशोर पाटील आणि गटविकास अधिकारी के. बी. अंजने यांनी उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी आमदार किशोर पाटील यांनी गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत अतिरिक्त गटविकास अधिकारी पाटणकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. सारोळा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या संपूर्ण कारभाराची अतिरिक्त गटविकास अधिकाऱ्यांमार्फत येत्या १८ सप्टेंबरपासून सखोल चौकशी करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. आमदारांच्या या ठोस आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आपले आमरण उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.

या आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी विविध प्रमुख मागण्या मांडल्या होत्या. यात प्रामुख्याने ग्रामपंचायतीच्या मागील काही वर्षांतील कारभाराची निष्पक्ष चौकशी स्वतंत्र समितीमार्फत व्हावी, प्राप्त निधी, त्याचा खर्च, विकासकामांची मंजुरी, अंदाजपत्रके, मोजमाप पुस्तिका (MB Books) आणि बिलांची सखोल तपासणी करण्यात यावी, दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, तसेच चौकशी अहवाल ग्रामस्थांना उपलब्ध करून द्यावा, या मागण्यांचा समावेश होता. या उपोषणात हेमराज पाटील, जगदीश पाटील, रविंद्र अहिरे, समाधान भोई, विशाल पाटील, स्वप्निल पाटील, हर्षल पाटील, सागर पाटील, नितीन पाटील, ओम पाटील, किरण पाटील, आदित्य पाटील, सुनिल पाटील, अमोल पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.


Protected Content

Play sound