Home क्राईम कासोदा पोलिसांची कारवाई ; २३ शेळ्या-बोकड चोरीचा गुन्हा उघड, दोन आरोपी ताब्यात

कासोदा पोलिसांची कारवाई ; २३ शेळ्या-बोकड चोरीचा गुन्हा उघड, दोन आरोपी ताब्यात

0
17


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कासोदा शिवारातील शेतातील पत्री शेडमधून चोरीला गेलेल्या तब्बल २३ शेळ्या-बोकड चोरीचा गुन्हा कासोदा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने थेट मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यात जाऊन दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी चोरीची कबुली दिली असून, चोरीच्या शेळ्या-बोकडांची वाहतूक करण्यासाठी वापरलेले वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे.

दि. ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेपासून ते ४ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान कासोदा शिवारातील एका शेतातील पत्री शेडमधून अज्ञात चोरट्यांनी १८ लहान-मोठ्या शेळ्या आणि ५ लहान-मोठे बोकड, असे एकूण २३ जनावरे चोरून नेली होती. याप्रकरणी फिर्यादीने ६ सप्टेंबर रोजी कासोदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कासोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांना गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार श्रीकांत पाटील यांनी आपल्या अधिपत्याखाली पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचे तपास पथक तयार केले. तपास पथकाने तांत्रिक तपासणीसोबतच गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान चोरीच्या घटनेचे धागेदोरे मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यापर्यंत पोहोचले. त्यानंतर पोलिसांचे पथक भगवानपुरा तालुक्यातील बडी गावात पोहोचले आणि संशयित आरोपींचा शोध घेतला.

पोलिसांनी या कारवाईत अजय राजू चौव्हाण (रा. साईखेडी, ता. भगवानपुरा, जि. खरगोन, मध्यप्रदेश) आणि सोहन विश्राम ब्राम्हणे (रा. बडी, ता. भगवानपुरा, जि. खरगोन, मध्यप्रदेश) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चोरीच्या गुन्ह्याबाबत कौशल्यपूर्ण पद्धतीने चौकशी केली असता, त्यांनी कासोदा शिवारातून शेळ्या-बोकड चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरीस गेलेल्या शेळ्या-बोकडांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहनही पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून जप्त केले आहे. आरोपींकडे पुढील चौकशी केली असता या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींची नावेही पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाली आहेत. त्यामुळे या आरोपींचा शोध घेण्याबरोबरच चोरीस गेलेल्या उर्वरित शेळ्या-बोकडांचा शोध घेण्याची कार्यवाही पोलिसांकडून सुरू आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड, चाळीसगाव उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक तथा कासोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रेड पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण गाडीलोहार आणि पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.


Protected Content

Play sound