


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सागर दिलीप बिऱ्हाडे खून प्रकरणातील २२ वर्षीय संशयित आरोपी सुमित उर्फ टक्या उमेश उर्फ दीपक सपकाळे (रा. आव्हाणे, ता. जळगाव) याला जळगाव सत्र न्यायालयाने सशर्त नियमित जामीन मंजूर केला आहे. सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी यांनी हा निर्णय दिला.
फिर्यादी रेखाबाई सागर बिऱ्हाडे यांच्या तक्रारीनुसार, २२ जानेवारी २०२६ रोजी रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास आव्हाणे गावात ही घटना घडली होती. मद्यधुंद अवस्थेत झालेल्या वादानंतर आरोपी सुमित याने सागर बिऱ्हाडे यांना मारहाण करून रस्त्यावर आपटून ठार केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर २३ जानेवारी २०२६ रोजी सुमितला अटक करण्यात आली होती.
जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबांचा आधार घेण्यात आला. घटनेच्या वेळी मृत सागर बिऱ्हाडे यांनी स्वतः दारूच्या नशेत आरोपीला शिवीगाळ करून ओढल्याचे साक्षीदारांच्या जबाबातून दिसून येत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे हा प्रकार अचानक झालेल्या वादातून घडल्याचा युक्तिवाद करण्यात आला.
तसेच आरोपी कोणतेही प्राणघातक हत्यार घेऊन घटनास्थळी आला नव्हता, त्यामुळे घटनेमागे पूर्वनियोजन नसल्याचेही न्यायालयासमोर मांडण्यात आले. अचानक झालेला वाद आणि पूर्ववैमनस्याचा अभाव यामुळे भारतीय न्याय संहितेतील संबंधित अपवादात्मक तरतुदींचा खटल्याच्या सुनावणीदरम्यान सखोल विचार करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
दरम्यान, पोलिसांचा तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. आरोपी २२ वर्षांचा असून तो मजुरीचे काम करतो. त्याच्याविरुद्ध पूर्वी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आले. आरोपी गेल्या साडेसात महिन्यांपासून कोठडीत असल्याने या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने त्याला सशर्त नियमित जामीन मंजूर केला.
न्यायालयाच्या आदेशानुसार, आरोपीची ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तसेच तितक्याच रकमेच्या एका जामीनदारावर सुटका करण्यात येणार आहे. आरोपीच्या वतीने ॲड. ऐश्वर्या मंत्री आणि ॲड. पंकज पाटील यांनी प्रभावी युक्तिवाद केला.
अचानक झालेला वाद, पूर्वनियोजनाचा अभाव, आरोपीची कोणतीही पूर्व गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणे, तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र दाखल होणे आणि दीर्घकाळ कोठडीतील वास्तव्य या बाबींच्या आधारे सुमित उर्फ टक्या सपकाळेला सशर्त जामीन मिळाला आहे.



