


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा न्यायालय, सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय आणि जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग येथे शनिवारी, १२ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबित व वादपूर्व अशी एकूण ४,१०२ प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई उच्च न्यायालय आणि जळगावचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोकअदालत पार पडली. सर्व न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि दोन्ही बाजूंच्या पक्षकारांच्या सक्रिय सहकार्यामुळे २,८४५ दाखलपूर्व (Pre-litigation) व १,२५७ प्रलंबित प्रकरणे निकाली निघून त्या माध्यमातून तब्बल ३५ कोटी ३२ लाख १२,६५९ रुपये ४२ पैसे इतकी अवाढव्य रक्कम वसूल करण्यात यश आले आहे.
या राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी अध्यक्ष तथा प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. खोंगल यांच्या शुभहस्ते पार पडले. या यशस्वी आयोजनासाठी न्या. खोंगल यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. विशेष म्हणजे, या मुख्य लोक अदालतीच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून ७ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत राबवण्यात आलेल्या ‘विशेष मोहिमे’त (Special Drive) ६६५ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली होती.
या लोक अदालतीत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर जिल्हाधिकारी श्रीमंत हरकर, उपविभागीय अधिकारी योगेशकुमार मीना (प्रोबेशनरी IAS), जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. सुरेंद्र काबरा, सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता ॲड. सुनील चोरडिया, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. दर्शन देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी गणापुरे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पेंदाम, वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. राजेश गवई आणि सचिव ॲड. आशिष पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
प्रकरणांवर सुनावणीसाठी पॅनल न्यायाधीश म्हणून जिल्हा न्यायाधीश ए. एस. खडसे, के. जी. सावंत, एम. एन. फटांगरे, ग्राहक आयोगाच्या न्यायाधीश छाया सपके, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एन. एस. बुद्रुक, सह दिवाणी न्यायाधीश एस. बी. वाळके, एस. एम. चव्हाण, डी. ए. सरनायक, एम. एम. निकम, डी. एम. पवार, सहकार न्यायालयाच्या न्यायाधीश एस. बी. घुटे यांनी काम पाहिले. तसेच उप-मुख्य लोक अभिरक्षक ॲड. मंजुळा मुंदडा, प्रभारी प्रबंधक एम. पी. कोठावदे, कैलास पाटील, ललित चौधरी, ए. सी. भट, आर. के. पाटील, प्रमोद ठाकरे, जयश्री पाटील, संतोष तायडे, आकाश थोरात, हर्षल पाटील, सचिन पवार आदींनी हे आयोजन यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.



