


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित शहरातील प्रतिष्ठित मूळजी जेठा (मू. जे.) स्वायत्त महाविद्यालयाच्या वतीने पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी बहुप्रतिक्षित ‘पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ’ आयोजित करण्यात आला आहे. हा दिमाखदार सोहळा बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता के. सी. ई. सोसायटीच्या कान्ह ललित कला केंद्र संचालित महाकवी कालिदास सभागृहात रंगणार आहे. या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विजय एल. माहेश्वरी लाभणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान के. सी. ई. सोसायटीचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील भूषवतील.
या विशेष समारंभासाठी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ते २०२४-२५ दरम्यान उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने प्रशासनाने महत्त्वपूर्ण नियोजन केले आहे. यानुसार केवळ गुणवत्ता यादीतील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांनाच व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. तर द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र काऊंटरवर प्रमाणपत्रे वाटप केली जातील. कार्यक्रमाच्या दिवशी उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना यादीतील अनुक्रमांकानुसारच प्रमाणपत्रांचे वाटप होणार आहे.
समारंभात पदवी स्वीकारताना विद्यार्थ्यांनी विशिष्ट ‘उत्तरीय’ (सन्मान वस्त्र) परिधान करणे अनिवार्य करण्यात आले आहे. हे उत्तरीय १५० रुपये शुल्क भरून कार्यक्रमाच्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या स्वतंत्र काऊंटरवरून विद्यार्थ्यांना प्राप्त करता येईल. जे विद्यार्थी या सोहळ्यास प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी त्यांची मूळ पदवी प्रमाणपत्रे ३१ मार्च २०२७ पर्यंत कार्यालयीन वेळेत महाविद्यालयाच्या मुख्य कार्यालयात उपलब्ध राहतील. या सोहळ्याबाबतच्या सर्व अद्ययावत सूचना महाविद्यालयाच्या http://mjcollege.kces.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
याच दिवशी सकाळी ०९:३० वाजता महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीतील जुन्या कॉन्फरन्स हॉलमध्ये २०२०-२१ ते २०२४-२५ या बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी ‘माजी विद्यार्थी मेळावा’ (Alumni Meet) आयोजित करण्यात आला आहे. यात विशेषतः द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या औचित्याने महाविद्यालयात विविध दर्शनीय वस्तू, माहिती पत्रके आणि पोस्टर्सचे भव्य प्रदर्शन भरवले जाणार आहे. या सोहळ्यास सुवर्णपदकासाठी अनुदान देणारे दाते, गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रभारी प्राचार्य डॉ. केतन नारखेडे आणि समन्वयक डॉ. भूपेंद्र केसूर यांनी दिली आहे.



